डोंबिवली : येम् तायक्वांदो एज्युकेशन सेंटर आणि कुणाल सरमळकर यांच्या सहकार्याने दुसरा तायक्वांदो क्रिडा महोत्सव नुकताच पीडब्ल्यूडी कम्युनिटी हॉल येथे पार पडला. या महोत्सवात २५० खेळाडूंनी सहभाग घेऊन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या क्रीडा महोत्सवाचे ज्योती हंकारे यांच्या नेतृत्वाखाली येम् तायक्वांदो अकॅडमी यांनी उत्कृष्टरित्या आयोजन केले होते. हंकारे या स्वतः ब्लॅक बेल्ट असून नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावले. ही पूर्ण स्पर्धा सेन्सॉर टेक्नॉलॉजी वापर करून आयोजीत केल्यामुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाचा अनुभव आणि भारतातही तायक्वांदो या खेळाचा प्रसार व्हावा व उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावेत हा हेतू होता.
या क्रीडा महोत्सवात आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रिशा संतोष शेट्टी, आशियाई स्पर्धेत सहभागी श्रावणी तेली, रूद्र खंदारे, कियान देसाई, अक्षरा शानभाग, काव्या धोदयानोर या खेळाडूंचा महोत्सवात सन्मानचिन्हासह तायक्वांदो युनिफॉर्म देऊन गौरव करण्यात आला. या क्रीडा महोत्सवाला महाराष्ट्र ऑलिम्पिकचे सचिव नामदेव शिरगावकर, तायक्वांदो राज्य सचिव संदीप ओंबासे, शिवसेना विभागप्रमुख कुणाल सरमळकर, पल्लवी सरमळकर, आदी मान्यवर उपस्थित होते.