मुंबईत 26 नोव्हेंबरला संविधान जागर यात्रा : विविध संघटना, संस्था होणार सहभागी
मुंबई — स्वातंत्र्य, समता, बंधुतेच्या पायावर उभ्या असलेल्या भारतीय संविधानाने सर्व भारतीय जोडले गेले आहोत. आज संविधानाने दिलेली हमी व मूल्ये धोक्यात आली आहेत. अशावेळी जनतेला संविधानातील मूल्यांप्रती सजग व क्रियाशील होण्याचे आवाहन करण्यासाठी विविध संघटनांनी एकत्र आल्या आहेत. ज्या दिवशी संविधान मंजूर झाले त्या संविधान दिनी, २६ नोव्हेंबरला गोवंडी – देवनार येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून दादरच्या चैत्यभूमीपर्यंत दुपारी 12 ते सायंकाळी 7 या वेळेत ‘संविधान जागर यात्रा’ काढली जाणार आहे. माजी खासदार प्रकाश आंबेडकर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, विद्यार्थी नेता कन्हैया कुमार, आमदार विद्या चव्हाण, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्रा. पुष्पा भावे, रामदास भटकळ आदी सहभागी होणार आहेत.
देवनार येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा – चेंबूर नाका – अण्णाभाऊ साठे उद्यान- पुणे-मुंबई महामार्गावरुन राणी लक्ष्मी पार्क – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरुन खोदादाद सर्कल – लो. टिळक पूल – कोतवाल उद्यान – एस. के. बोले मार्ग – प्रबोधनकार ठाकरेंचा पुतळा – रानडे रोडवरील सेनापती बापटांचा पुतळा – चैत्यभूमी असे संविधान जागर यात्रेचा मार्ग असेल. संविधानाची प्रतिकृती व संविधानाची माहिती सांगणारे फलक लावलेला ट्रक तसेच अन्य वाहने, मोटार सायकली असतील. गाणी व घोषणा दिल्या जाणार आहेत. वैदू तसेच अन्य भटक्या व आदिवासी विभागातील लोक त्यांच्या पारंपरिक वेषात सहभागी होणार आहेत. सायंकाळी ५ वाजता चैत्यभूमी, दादर येथे यात्रेच्या समारोपाची सभा होईल. यावेळी प्रारंभी शाहीर संभाजी भगत यांची गाणी होतील. त्यानंतर होणाऱ्या निवडक भाषणांतील प्रमुख भाषणे विद्यार्थी नेता कन्हैया कुमार व माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांची असतील, अशी माहिती संविधान जागर यात्रेच्या आयोजकांनी दिली.
….