बंगळुरू – देशातील सर्वांत मोठी अॅडटेक कंपनी असलेल्या बायजू कंपनीच्या अडचणी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. या कंपनीच्या चार गुंतवणूकदारांनी कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध गैरव्यवस्थापन आणि दडपशाहीचा आरोप करत राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणमध्ये खटला दाखल केला आहे.त्यांनी कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना कंपनी चालवण्यापासून अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे.
या चार गुंतवणूकदारांनी बायजूचे फॉरेन्सिक ऑडिट व्हायला हवे.याशिवाय कंपनीत नवीन बोर्ड नियुक्त करून हक्काचा मुद्दा रद्दबातल ठरवण्यात यावा अशी मागणी केली आहे.नुकतीच बायजूने सर्वसाधारण सभा बोलावली होती.यावेळी कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची कंपनीतून हकालपट्टी करण्याची मागणी केली.बायजू कंपनीचे सर्वसाधारण सभेत संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन,त्यांची पत्नी आणि सह-संस्थापक दिव्या गोकुलनाथ आणि रवींद्रनचा भाऊ रिजू रवींद्रन हे सहभागी झाले नव्हते.
रवींद्रन आणि कुटुंबापेक्षा प्रतिस्पर्धी गुंतवणूकदारांकडे जास्त शेअर्स आहेत.ज्या गुंतवणूकदारांनी रवींद्रन आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कंपनीतून काढून टाकण्याची मागणी करत सभा घेतली, त्यांचा कंपनीत ३० टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे.रवींद्रन, त्यांची पत्नी आणि भाऊ यांची थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडमध्ये २६.३ टक्के हिस्सेदारी आहे.थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड ही बायजूची मूळ कंपनी आहे.२०२२ या आर्थिक वर्षात बायजूला ८२४५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यानंतर बायजू केवळ तोट्यात चालणारी देशातील सर्वात मोठी स्टार्टअप बनली आहे.