डोंबिवली : सुरक्षेच्या कारणावरून महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावण्यास परवानगी आहे. झेड आणि झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या काचांवरही काळी फिल्म लावण्याची मुभा आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीच्या वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावण्यास परवानगी नाही. मात्र, आज ही कल्याण डोंबिवली शहरात अनेक जण आपल्या वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावून धावतात. त्यातील बहुतांश गाड्या या राजकीय मंडळी व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आहेत. पोलिस आणि आरटीओ विभागाने त्याकडे जाणीपुर्वक डोळेझाक केल्यामुळे या कार निर्धास्तपणे धावत आहेत. तसेच शहरातील बहुसंख्य ऑटोमोबाईल दुकानांवर अशा काळ्या फिल्मची सर्रास विक्री केली जात आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कारच्या काचांवर काळ्या फिल्म लावणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी सुरू केलेली मोहीम थंडावली आहे. त्यामुळे सुमारे कारच्या काचांवर ६० ते ८० टक्के काळ्या फिल्म कायम आहेत. पोलिस आणि आरटीओ विभागाने डोळेझाक केल्यामुळे या कार निर्धास्तपणे धावत आहेत. शहरातील बहुसंख्य ऑटोमोबाईल दुकानांवर काळ्या फिल्मची सर्रास विक्री केली जात आहे.सुरक्षिततेच्या दृष्टिने चारचाकी वाहनांच्या काचांना काळ्या फिल्म लावू नयेत, असे आदेश २७ एप्रिल २०१२ रोजी सुप्रीम कोर्टाने दिले . वाहनांच्या काचा पारदर्शक ठेवून गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाने वाहनांच्या काळ्या काचांवर आक्षेप घेतला. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी कारच्या काचांवरील फिल्म काढण्यासाठी मोहीम राबविली. काही दिवसानंतर ही मोहीम गुंडाळण्यात आली.त्यामुळे आता जिकडे तिकडे काचांवर काळी फिल्म लावून धावणारी वाहने सर्वत्र आढळतात. अशा वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.
सर्वसामान्य वाहनधारकांसह उच्चपदस्थ अधिकारी, लोकप्रतिनिधीं व त्याचे कार्यकर्ते त्यांच्या वाहनांनाही काळ्या काचा कायम आहेत. केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९, नियम १०० (२) : वाहनांच्या समोरील व मागील काचेची पारदर्शकता ७० टक्क्यापेक्षा अधिक, तर खिडक्यांच्या काचेची पारदर्शकता ५० टक्क्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे, मात्र कल्याण डोंबिवली शहरातील वाहनांची परिस्थिती पाहिल्यास पुढची काच सोडल्यास इतर सर्व खिडक्यांच्या काचा ८० ते १०० टक्के काळ्या असल्याचे दिसते. दरम्यान केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांवर रंगीत फिल्म लावणे गुन्हा आहे, मात्र त्यासाठी दंडात्मक शिक्षेची तरतूद आहे. केवळ शंभर रुपये दंड आकारून वाहनधारकाला सोडून दिले जाते. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांनाच या काचेवरील फिल्म काढण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात.