कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सौर उर्जा क्षेत्रातील भरीव कामगिरी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स यांचा ४था ग्रीन ऊर्जा व ऊर्जा संवर्धन पुरस्कार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस प्राप्त झाला आहे. इंडिया हॅबिटाट सेंटर, नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या १२व्या ग्रीन एनर्जी समीतमध्ये इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला ४था ग्रीन उर्जा व उर्जा संवर्धन पुरस्कार देवून सन्मानित केले.

देश स्तरावर सौर उर्जा क्षेत्रात व महापालिकेच्या विविध विभागात उर्जा संवर्धन क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेवून संपूर्ण देशातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवड करण्यात आली आणि महापालिकेच्या वतीने विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत रा. भागवत यांनी हा पुरस्कार स्विकारला.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सन २००७ पासून महापालिका क्षेत्रातील नविन इमारतीवर सौर ऊर्जा संयत्रे आस्थापित करणे विकासकांना बंधनकारक केले आहे. त्याकामी महापालिकेच्या विद्युत विभागाने प्रभावी यंत्रणा तयार करुन प्रभावीपणे अंमलबजावणी केलेली आहे. सन २००७ ते २०२१ या कालावधीत एकूण १८३२ इमारतीवर १ कोटी ८ लक्ष लीटर्स प्रती दिन क्षमतेचे सौर उष्ण जल संयंत्रे विकासकाकडून आस्थापित केलेले आहे. त्यामुळे इमारतींमध्ये गिझरचा वापर न होता प्रती वर्ष १८ कोटी वीज युनिटची बचत होत आहे. सन २०२१ पासून महानगरपालिकेने विकासकांना रुफ टॉप नेट मीटर सौर उर्जा निर्मिती करणारे प्रकल्प आस्थापित करणे बंधनकारक केले असून आजपर्यंत ११९ इमारतीवर २०८३ किलो वॅट क्षमतेचे रुफ टॉप नेट मीटर सौर ऊर्जा निर्मिती करणारे प्रकल्प विकासकाकडून आस्थापित करुन घेतल्याने प्रती वर्ष ३० लक्ष विज युनिट सौर ऊर्जा निर्मिती होत आहे.

महानगरपालिकेने आधारवाडी येथील नविन प्रशासकीय इमारतीवर २५ किलो वॅट क्षमतेचे रुफ टॉप नेट मीटर सौर प्रकल्प कार्यान्वित आहे. तसेच प्रभागक्षेत्र कार्यालय व आयुक्त निवास स्थान येथे एकूण १० इमारतीवर १६० किलो वॅट क्षमतेचे रुफ टॉप नेट मीटर सेंटर ऊर्जा निर्मिती प्रकल्प माहे फेब्रुवारी अखेरीस कार्यान्वित होणार आहे.

ऊर्जा संवर्धन क्षेत्रात महानगरपालिकेने महापालिका निधी व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातील जूने परंपरागत सोडीयम दिवे काढून उर्जा बचत करणारे एल.ई.डी पथदिवे बसविलेले आहेत. ऊर्जा संवर्धन क्षेत्रात महापालिकेच्या दोन्ही रंगमंदिरातील परंपरागत चिलर काढून ऊर्जा कार्यक्षम व ऊर्जा बचत करणारे चिलर व महापालिका कार्यालयामध्ये उर्जा बचत करणारे २८ वॅट क्षमतेचे सिलींग फॅन व एल.ई.डी लाईटस बसवून ऊर्जा संवर्धन क्षेत्रात सुध्दा भरीव कामगिरी केली आहे. महापालिकेने उंबर्ड, आयरे, कचोरे येथे प्रत्येकी १० मेट्रीक टन क्षमतेचे वेस्ट टू एनर्जी प्रकल्प कार्यान्वित केले असून कच-या पासून वीज निर्मिती होत आहे. आधारवाडी येथे २ टन क्षमतेचे बायोमास प्रकल्प कार्यान्वित केला असून स्लॉटर हाऊस मधील वेस्ट पासून वीज निर्मिती होत आहे. ऊर्जा संवर्धन व सौर ऊर्जा वापर याबाबत महानगरपालिकेने शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, मॅरेथॉन स्पर्धेतील स्पर्धक व नागरीकांमध्ये वेगवेगळया महोत्सवांमध्ये व मोठ्या रहिवासी सोसायटी येथे पथनाट्य व उर्जा संवर्धन गीतच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली शहरातील नागरीकांमध्ये मोठया प्रमाणात जनजागृती केली आहे. या पुरस्कारामुळे महापालिकेच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *