वरूड (अमरावती) : संत्राबागांवर रोगराई ओसरल्यानंतर आता अवकाळी पावसामुळे बहराला ताण न बसणे आणि त्यातच निर्यातीतील अडचणी असल्याने व्यापा-यांकडून मिळत असलेला कमी दर या बाबीतून होणारी संत्राउत्पादकांची कुचंबणा थांबविण्यासाठी देशातील पहिली संत्रा डिजिटल मंडई वरुडात स्थापन झाली आहे. शेतक-यांना आणलेल्या संर्त्याला ग्रेडेशननुसार वेगवेगळ्या वर्गवारीत टाकले जात असल्याने किरकोळ संत्र्यालाही हमखास दर येथे मिळत आहे. खासगी संस्थेच्या सहकार्याने उभारलेल्या या उपक्रमामुळे संत्रा उत्पादकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
वरूड, मोर्शी तालुक्यात आंबिया आणि मृग बहारच्या संर्त्याचे हजारो टन उत्पादन घेतले जाते. परंतु ऐनवेळी परप्रांतासह बांगलादेशात भाव कोसळले की, याचा फटका थेट संत्रा उत्पादकांना बसतो. यंदा व्यापारीदेखील संत्राबागेकडे फिरकले नसल्याचे चित्र आहे. हे टाळण्यासाठी डिजिटल संत्रा मंडईसाठी वरूड कृषिउत्पन्न बाजार समिती आणि फ्रूट एक्स कंपनी यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. कंपनीकडून स्थापित यंत्रातून संत्र्याचे आकारानुसार ग्रेडिंग करून ते क्रेटमध्ये आपोआप पडतात. त्यानंतर त्याचा देशाच्या कानाकोप-यातून उपस्थित व्यापारी तसेच त्यांचे प्रतिनिधी यांच्यामार्फत लिलाव केला जातो.
यामुळे संर्त्याला चांगला दर मिळत आहे. देशातील पहिली डिजिटल संत्रा मंडई म्हणून येथील बाजार समितीच्या संत्रा मंडईला मान मिळाला. ग्रेडेशनमुळे टाकाऊ संत्रीसुद्धा विकली जात आहेत. याचा संत्रा उत्पादकांना फायदा होत असून दिवसाला १०० टन संत्री विकली जात आहेत. देशांतर्गत सफरचंदासह विविध फळांचे ग्रेडेशन, विक्री करणा-या हैदराबाद येथील फ्रूट एक्सने विदर्भाचा कॅलिफोर्निया असलेल्या वरूड परिसरात पहिल्यांदाच संत्र्यांच्या लिलावासाठी सामंजस्य करार केला आहे. कंपनीने बाजार समितीच्या संत्रा लिलाव मंडईमध्ये ग्रेडिंग युनिट उभारले. यामध्ये ७५ पैसे प्रतिकिलो दराने संत्रा ग्रेंिडग, भराई आणि ग्रेंिडगनुसार लिलाव करण्याची जबाबदारी कंपनीची आहे. प्रतवारीनुसार संत्रा विक्री करून वेळीच शेतक-यांना पैसे दिल्या जाते. डिजिटल संत्रा लिलाव मंडईमध्ये शेतक-यांनी आणलेल्या संत्र्याचे ग्रेडेशन होऊन ते क्रेटमध्ये पडतात आणि त्यानंतर विकले जातात. सर्वोच्च गुणवत्तेच्या फळांसाठी लिलावात ४५ ते ४० रुपये किलो दर मिळतो, तर निम्नस्तर संत्रीसुद्धा २० रुपये किलोने जातात.