सोलापूर : सोलापूर शहर डॉल्बीमुक्त करण्याचा निर्धार नूतन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी केलाय. यासाठी शांतता कमिटीच्या सदस्यांना आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना चक्क डॉल्बी वाजवून आवाजाचे प्रमाण किती असावे याचे प्रात्यक्षिक पोलीस आयुक्तानी दिले. अन्यथा कारवाईचा इशारा ही यावेळी देण्यात आला. सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे होतात. या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात डीजे, डॉल्बीचा वापर होतो. यामुळे अनेक नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येतं असतात. मात्र प्रशासनकडून कोणतीही ठोस कारवाई केली जातं नाही. सोलापुरात नव्याने रुजू झालेले पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी मात्र सोलापूरला डॉल्बीमुक्त करण्याचा निर्धार केलाय.
काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यासाठी सोलापुरात मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघणार आहेत. पोलीस प्रशासनातर्फे मिरवणुक पारंपरिक पद्धतीने करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसर अनेक मंडळानी पारंपरिक वाद्य, मर्दानी खेळ अशा पद्धतीने मिरवणूक काढण्याचा निर्धार केला. मात्र काही जण अजूनही डॉल्बीच्या मागणीसाठी आग्रही आहेत. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी यासंदर्भात शांतता कमिटीचे सदस्य आणि विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलवले. या बैठकीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. तसेच पारंपारीक पद्धतीने मिरवणुक काढणाऱ्या मंडळाना प्राधान्य देण्यात येणारं असून त्यामागे डॉल्बीचा वापर करणाऱ्या मंडळाना संधी देण्यात येईल. “डॉल्बीचा वापर करताना मोठ्या कंटेनरचा वापर करू नये. डॉल्बीचा आवाज हा मर्यादेत असावा अशा सूचना केल्या.” विशेष म्हणजे पोलीस आयुक्त कार्यालयात डॉल्बी आणून प्रात्यक्षिक ही दाखवण्यात आले.

“डॉल्बीमुक्त शहर झाले पाहिजे : या चांगल्या कामाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज याच्या जयंतीच्या निमित्ताने करत आहोत. अशी संधी परत मिळणार नाही. अधिकारी येतो, बदलून जातो, हे सोलापूर तुमचे आहे. त्यामुळे तुम्ही मंडळांनी आपला स्टॅण्डर्ड सेट करा, जेणे करून इतर मंडळ तुमचा आदर्श घेतील. दोन बेस आणि दोन टॉप स्पीकर लावत सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या आवाजाची मर्यादा पाळा. गुन्हे दाखल झाल्याने भविष्य उध्वस्त होऊ शकते. मंडळाकडून शंभर टक्के सहकार्याची अपेक्षा आहे. मंडळे ही एकमेकांची स्पर्धा करीत गोंधळ करण्याची परंपरा चुकीची असून ती बदलावी लागेल.” असे आवाहन एम. राजकुमार यांनी या बैठकीत केले. दरम्यान पोलीस आयुक्तांच्या या सूचनाचे उपस्थित मंडळाच्यावतीने स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *