मुंबई दि. 6:-महायुती सरकारची भूक दिवसेंदिवस वाढत आहे. सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता हे या सरकारचे ब्रिद आहे. राज्यात आठ हजार कोटींचा अँम्बुलन्स घोटाळा गाजतो आहे. तोपर्यंत सरकारने मोबाईल घोटाळा केला आहे. मर्जीतल्या कंपनीकडून १५५ कोटी रूपयांची मोबाईल खरेदी करण्याचा सरकारचा इरादा आहे. त्याचबरोबर निवडणुका डोळ्यासमोर मतं मिळवण्यासाठी अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना सरकार साड्या वाटणार आहे. हा घोटाळा देखील 100 कोटींच्यावर आहे. या दोन्ही घोटाळ्यातील वाटा मंत्री आणि सरकारला मिळणार असल्याचा जोरदार हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. 

.वडेट्टीवार म्हणाले की, या सरकारमध्ये दोन अलिबाबा आणि ८० चोर आहेत. त्यांच्यात पैसे खाण्याची स्पर्धा सुरू आहे. लोकसभा आचारसंहिते अगोदर सरकारी तिजोरी लूटून खाण्याचा सरकारचा इरादा आता लपून राहिला नाही. पैसे खाण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्याची शक्कल सरकारने लढवली आहे. मोबाईल द्यायचा असेल तर सरकारने अंगणवाडी सेविकांच्या खात्यात थेट पैसे जमा करावेत. अंगणवाडी सेविकांना हवा तो मोबाईल घेण्याची मुभा द्यावी. मग भ्रष्टाचार होणार नाही. अंगणवाडी सेविका प्रामाणिक आहेत. त्यांच्यावर सरकारचा विश्वास नाही का? असा सवाल देखील श्री. वडेट्टीवार यांनी केला. 

सरकार दिल्लीतील मर्जीतील कंपनीचा खिसा भरणार आहे.महिला बाल विकास विभाग १५५ कोटी रुपयांचा चुना लावणार आहे. हा घोटाळा सरकारने वेळीच थांबवावा, दिल्लीची ही कंपनी कुणाच्या जवळची आहे याची चौकशी करावी. अंगणवाडी सेविकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी श्री. वडेट्टीवार यांनी केली.

 वडेट्टीवार म्हणाले की, अँम्बुलन्स, मोबाईल घोटाळ्यानंतर आता सरकारने साडी घोटाळा केला आहे. अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला महायुती सरकार एक साडी देणार आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार मतं मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.

राज्यातील महिला असुरक्षित आहेत. राज्यातली तरूणी, महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. गावगुंडांचा, नराधमांचा, रोड रोमियोंचा त्रास सुरूच आहे. महिला सक्षमीकरणात सरकार अपयशी आहे. महिलांना रोजगार मिळत नाही. तरी देखील सरकार दुर्लक्ष करत आहे. सरकार २५ लाख साड्या खरेदी करणार आहे. सरकारचा हा दिखावा आहे. खरतर सरकारकडून १ कोटी साड्या खरेदी होणार असल्याची आमची माहिती आहे. सरकारने हे या साड्या खरेदीचे पैसे महिला सुरक्षेसाठी खर्च करावेत. या सरकाची पत एवढी खाली आली आहे की, यांना निवडणुकीसाठी साड्या वाटण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात  वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले.

०००००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *