मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्यानंतर कायदा सुव्यवस्थेवरून विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे.ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षांमध्ये माफिया आणि गुंडांचे राज्य सुरू आहे. निवडणुकांसाठी गुंडांची मदत व्हावी म्हणून पुणे, मुंबई, कोल्हापूर, ठाणे जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांना जामीनावर बाहेर काढलं जात आहे”, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री कुठे आहे. ते आम्हाला कायदा शिकवतात. अजित पवार म्हणतात मी गृहमंत्र्यांशी चर्चा करीन, हे प्रकरण फक्त गृहमंत्र्यांसोबत चर्चा करण्यापुरतंच मर्यादीत नाही”, अशी टीकाही राऊतांनी केली.
भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांचं निवेदन सामान्य जनतेने समजून घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मी गोळीबार केला, असं ते म्हणत आहेत. कारण मुख्यमंत्रीच गुन्हेगारांना पाठिशी घालत आहेत आणि मदत करत आहेत”, असा आरोपही संजय राऊत यांनी केला. देवेंद्र फडणवीस आपण वकील आहात, ज्ञानी आहात. राम तुमच्या बाजूने आहे, तुमचं राज्य कायद्याचं आहे का? ज्या आमदाराने गोळीबार केला आहे त्याला जामीन मिळेल”, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.