कल्याण : कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि कल्याण शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख,तथा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांच्या समोरच हा गोळीबार झाल्याचे बोललं जात आहे. या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे दोघेजण जखमी झाले आहेत. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आमदार गायकवाड यांनी मी गोळीबार का केला याच कारण सांगितलं.
या प्रकरणानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी z 24 तास ला प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की, “पोलिस स्टेशनमध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा जबरदस्ती कब्जा घेतला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचे राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील, तर महाराष्ट्रात गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसांना एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार केलं आहे. माझा मनस्ताप झाला, म्हणून मी फायरिंग केली.”
“मी स्वत: पोलिसांसमोर गोळी झाडली. मला याचा पश्चाताप नाही. कारण माझ्या मुलांना जर ते पोलिसांच्या समोर मारत असतील, तर मग मी काय करणार. पोलिसांनी मला पकडलं. त्यामुळेच तो वाचला. मी त्यांना जीवे मारणार नव्हतो. पण पोलिसांच्या समोर जर असं कोणी करत असेल, तर आत्मसंरक्षणासाठी हे करणं गरजेचे आहे. एकनाथ शिंदेंनी असेच गुन्हेगार सर्व ठिकाणी पाळून ठेवले आहेत. मी बऱ्याचदा वरिष्ठांना याबद्दल सांगितलं आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले”, असेही गणपत गायकवाड यांनी सांगितले.
नेमकं काय घडलं?
गायकवाड यांनी घडलेल्या सर्व घटनाक्रमाचीही माहिती दिली. “मी दहा वर्षांपूर्वी एक जागा घेतली. मी त्या जागा मालकांना पैसे दिले. पण त्यांनी सही केली नाही. त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो. आम्ही केस जिंकलो. त्यानंतर 7/12 जेव्हा आमच्या नावावर झाला, त्यानंतर महेश गायकवाड यांनी जबरदस्ती त्या जागेवर कब्जा केला. मी काही दिवसांपूर्वी याबद्दल त्यांना विनंती केली होती. तुम्ही कोर्टात जाऊन याबद्दल रितसर ऑर्डर आणा, असेही त्यांना सांगितले होते. आज कंपाऊंड तोडून 400 ते 500 लोकांना घेऊन त्यांनी आत प्रवेश केला. माझा मुलगा पोलिस स्टेशनमधून बाहेर जात होता, त्यावेळी त्यांनी धक्काबुक्की केली. मला ते सहन झालं नाही, त्यामुळे मी गोळीबार केला. मला याचा पश्चाताप नाही”, असे ते म्हणाले. या घटने नंतर भाजप आणि शिंदे गट यांच्यातील वाद उफाळून आला असून, आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केल्याने भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री यावर काय प्रतिक्रिया देतात याकड लक्ष वेधले आहे.
——-