मनोवी ग्रुप आणि कुंभार वाडा मित्र मंडळाचा उपक्रम
कल्याण दि.22 जानेवारी : देशाच्या अध्यात्मिक आणि धार्मिक इतिहासातील सुवर्ण क्षण असलेल्या प्रभु श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा अतिशय दिमाखदाररित्या पार पडला. प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी देशभरात अक्षरशः दिवाळी साजरी होत आहे. या प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक कल्याण नगरीत प्रभू श्रीरामांची ६ फुटांची भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे. कल्याणातील मनोवी ग्रुप, कुंभारवाडा मित्र मंडळ आणि रायसी रामजी राठोड कुटुंबियांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी सर्वत्रच मोठा उत्साह दिसून येत आहे. कोणी दिपोत्सव करत आहे, कोणी सामूहिक आरती पठण तर कुठे फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत दणाणून गेला आहे. जागोजागी भगव्या पताका, प्रभू श्रीरामांच्या प्रतिमा आणि क्षणाक्षणाला कानावर पडणारा जय श्रीरामाचा जयघोष. अशा अत्यंत भारावलेल्या वातावरणात मनोवी ग्रुपच्या विमल ठक्कर, चेतन ठक्कर, तनय कारिया यांच्यासह कुंभारवाडा मित्र मंडळ आणि रायसी रामजी राठोड कुटुंबियांतर्फे प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी हा अनोखा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कल्याणात प्रथमच अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आज सायंकाळी याठिकाणी प्रभू श्रीरामांची महाआरती केली जाणार असल्याची माहिती मनोवी ग्रुपचे संचालक विमल ठक्कर यांनी दिली.
अशी साकारली प्रभू श्रीरामाची मूर्ती…
कल्याण पश्चिमेतील कुंभार वाडा येथे सायंकाळी पाच वाजल्यापासून मूर्तिकार किरण तूपगावकर आणि समीर येळेकर यांनी सर्व राम भक्तांसमक्ष ही मूर्ती घडवायला प्रारंभ केला. आणि साधारणपणे तीन ते चार तासांच्या कालावधीत ती पूर्णत्वास गेली. यासाठी शाडूच्या मातीचा वापर करण्यात आला आहे. काल संध्याकाळपासूनच शेकडो रामभक्तांनी याठिकाणी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत.