मुंबई : ‘मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम जीवनचरित्र’ या विषयावर आधारित चित्रकला, निबंध, कविता लेखन आणि नाट्य स्पर्धेत अवघ्या दहा दिवसांत मुंबईतील एक लाख २० हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुलांना लहान वयातच रामायणातील मर्म कळावे, म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळणार, असा आशावाद कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

‘मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम जीवनचरित्र’ या विषयावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून चित्रकला, निबंध, कविता लेखन आणि नाट्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज (दिनांक १९ जानेवारी २०२४) विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडला, यावेळी पालकमंत्री लोढा बोलत होते.

‘पद्मश्री’प्राप्त लेखक, विचारवंत रमेश पतंगे, गीतकार श्रीधर फडके, आमदार पराग अळवणी, उप आयुक्त (शिक्षण) चंदा जाधव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एक हजार १३८ शाळांमधील तब्बल १ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने अतिशय कमी वेळात ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. त्यामुळे हे सर्व कौतुकास पात्र आहेत. या स्पर्धेतील चित्रकला या विभागात जवळपास ७० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे या ७० हजार चित्रांचे शाळेत तसेच शाळेच्या जवळपास असलेल्या मंदिरात, सभागृहात प्रदर्शन भरवावे, अशी सूचनाही यावेळी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली.

गीतकार श्रीधर फडके म्हणाले, स्पर्धेत सहभागी सर्व मुलांनी अतिशय तन्मयतेने योगदान दिले आहे. मान्यवरांनी विनंती केल्यामुळे श्री. फडके यांनी गीत रामायणातील काही ओळी सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *