मिलिंद देवरा यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई : अवघ्या दोन महिन्यात लोकसभा निवडणूकांचे बिगुल वाजणार असल्याने आता सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यातच आता पक्ष प्रवेशाचे सोहळेही रंगणार आहेत.रविवारी मुंबई काँग्रेसचे नेते माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडून, शिंदेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे.शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघात शिंदे गटातून मिलिंद देवरा उमेदवार असतील हे स्पष्ट होऊ लागलं आहे. दरम्यान दक्षिण मुंबई मतदार संघासाठी भाजपही आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे या मतदार संघावरून भाजप आणि शिवसेनेसाठी ( शिंदे गट) कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात ४० आमदार आणि खासदार सामील झाले आहेत.शिवसेनेचे दोन गट पडले आहेत.शिंदे गट भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी गट अशी महायुती असून,ठाकरे हे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गट अशी महाविकास आघाडी आहे.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी होणार असली तरी जागा वाटपाबाबत अजूनही निश्चिती झालेली नाही.मात्र ज्या जागेवर ज्या पक्षाचा सिटींग खासदार असेल त्या पक्षाला ती जागा सोडली जाईल असे सूत्र ठरविण्यात येत आहे.

मागील निवडणुकीत दक्षिण मतदार संघात शिवसेनेचे अरविंद सावंत आणि काँग्रेसचे मिलिंद देवरा यांची लढत झाली होती.या लढतीत देवरा यांचा पराभव करून सावंत हे खासदार झाले.२०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकीत देवरा यांचा पराभव झाला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर सावंत हे ठाकरेंच्या गटात आहेत.शिवसेनेच्या ताब्यातील ही जागा असल्याने ठाकरेंच्या उमदेवाराविरोधात शिंदे गटाचा उमेदवार देण्याची शक्यता आहे.महाविकास आघाडीत जागा वाटपात हि जागा ठाकरें गटाकडे जाऊ शकते.ठाकरे गटाने तसा दावाही केला आहे.त्यामुळे काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठीत देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.त्यामुळे दक्षिण मुंबई मतदार संघात ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरूध्द शिंदे गटाचे मिलिंद देवरा अशी लढाई हेाणार हे अधोरेखीत झालं आहे.

दक्षिण मुंबईसाठी भाजपही आग्रही !

दक्षिण मुंबई मतदार संघात भाजपच्या तिकिटावर जयवंती बेन मेहता दोनवेळा निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे या जागेसाठी भाजपही आग्रही असल्याचे समजते. शिवसेना अपात्र प्रकरणामुळे चर्चेत असलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे दोन आमदार आहेत. या मतदारसंघातून भाजपकडून लोढा हे उमेदवार असल्याचीही चर्चा ऐकायला मिळते. त्यामुळे दक्षिण मुंबईसाठी भाजपही आग्रही असल्याचे समजते. शिंदे गटाकडे या मतदार संघासाठी चेहरा नसल्याने मिलिंद देवरा यांना पक्षप्रेवश देऊन शिंदे गट या मतदार संघावर दावा करू शकतं. त्यामुळे आता या मतदार संघावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच होणार हे निश्चितच समजले जात आहे.

दक्षिण मुंबई मतदार संघाचा हा इतिहास जाणून घेऊयात !

दक्षिण मुंबई हा उच्चभ्रू परिसर ओळखला जातो.या मतदार संघात वरळी, मलबार हिलसह ६ विधानसभांचा समावेश आहे. यापैकी दोन ठाकरे गटाकडे, एक शिंदेंच्या शिवसेनेकडे, दोन भाजप आणि एक काँग्रेसकडे आहे. वरळीतून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, शिवडी विधानसभा मतदारसंघात अजय चौधरी, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून अमिन पटेल, भायखळ्यातून यामिनी जाधव, मलबार हिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा आणि कुलाब्यातून राहुल नार्वेकर सध्या प्रतिनिधित्व करत आहेत.

दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. मिलिंद देवरा सलग दोन वेळा २००४ आणि २००९ मध्ये निवडून आले. मात्र २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव करुन शिवसेनेचे अरविंद सावंत खासदार झाले. या जागेवर १९५२ पासून ते १९६७ पर्यंत काँग्रेसचं वर्चस्व होतं. मात्र १९६७ जॉर्ज फर्नांडिस यांनी जनता दलातर्फे लढून हा मतदारसंघ काँग्रेसकडून खेचून आणला होता.

१९८४ पासून ते १९९६ पर्यंत काँग्रेसच्या मुरली देवरा यांचं वर्चस्व होतं. मग १९९६ मध्ये भाजपच्या जयवंतीबेन इथे निवडून आल्या. मात्र १९९८ मध्ये मुरली देवरा विजयी झाले. मग १९९९ मध्ये पुन्हा जयवंतीबेन मेहतांनी विजय मिळवला. २००४ मध्ये मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा काँग्रेसच्या तिकीटावर लढले. सर्वात तरूण खासदार म्हणून ते निवडून गेले. यूपीए सरकारच्या काळात ते केंद्रीय राज्यमंत्रीही होते. २०१४ पर्यंत ही जागा काँग्रेसकडे राहिली. मात्र २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत मिलिंद देवरा यांचा पराभव झाला आणि शिवसेनेचे अरविंद सावंत लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *