ठाकरेंना शिंदेची विनवणी करावी लागणार
मुंबई : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक जुन्या महापौर बंगल्यात साकारलं जात आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत आले असून, दुस-या टप्प्याचे कामाला सुरूवात होणार आहे. मात्र या कामासाठी ठेकेदार नेमण्यात आलेला नाही. नगरविकास विभागाकडून हा ठेकेदार नेमण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभाग आहे. त्यांच्या आदेशाशिवाय ठेकेदार नेमला जाऊ शकत नाही. त्यामुळे सध्या तरी बाळासाहेबांच्या स्मारकाच्या दुस-या टप्प्याच्या कामाला ब्रेक बसला आहे. त्यामुळे दुस-या टप्प्याच्या कामासाठी ठाकरेंना शिंदेची विनवणी करावी लागणार का ? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
दादर येथील जुन्या महापौर बंगल्यात स्व बाळासाहेब ठाकरे स्मारक उभं राहात आहे. जुन्या महापौर बंगल्याचा वारसा आणि पावित्रय जतन करून त्यामध्ये नवीन संग्रहालय उभारले जात आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास ९१ टक्के पूर्ण झाले आहे. तीन महिन्यात म्हणजेच मार्च २०२४ पर्यंत पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास येण्याची अपेक्षा आहे.
दुसऱ्या टप्प्यातील काम एमएमआरडीएकडे सोपविण्यात आले आहे. एमएमआरडीएने स्मारकाशी संबंधित डिजिटल कामाकरिता निविदा मागवल्या. तसेच हैदराबादमधील एका ठेकेदाराची नियुक्ती केली. संबंधित एजन्सीने ठाकरे स्मारक ट्रस्टला शिवसेना संस्थापक यांच्या जीवनावरील ऑडिओ-व्हिडिओ शो, डिजिटल वॉल्स आणि लेझर शोचे सादरीकरण केले. मात्र ठाकरे कुटुंबीय आणि पक्षाच्या नेत्यांचे वर्चस्व असलेल्या ट्रस्टने त्यावर नाराजी व्यक्त केली. दुसऱ्या ठेकेदारांकडून हे काम करण्याची मागणी केली. परंतु, एमएमआरडीने यावर अद्याप निर्णय न घेतल्याने कामाला विलंब होणार आहे.
काय आहे पहिल्या टप्प्यात
पहिल्या टप्प्यात प्रवेशद्वार, प्रशासकीय ब्लॉक आणि इंटरप्रिटेशन सेंटरचे बांधकाम, माजी महापौरांच्या बंगल्यातील सांस्कृतिक वारशाचे जतन तसेच आजूबाजूच्या परिसराचे लँडस्केपिंग आणि सुशोभीकरण यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ठाकरे यांची कारकिर्द दृक-श्राव्य द्वारे मांडली जाणार आहे.
नवा ठेकेदार नेमण्याची ट्रस्टची मागणी
शिवसेनाप्रमुखांच्या जीवनाशी संबंधित काम असल्याने मार्गदर्शक तत्त्वांनुसार, संस्थेने ठाकरे स्मारक ट्रस्टशी सल्लामसलत करून प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु, ठेकेदाराने सादर केलेली कल्पना नाकारत नवा ठेकेदार नेमण्याची ट्रस्टने मागणी केली आहे. नवा ठेकेदार नेमण्याचे अधिकार हे नगरविकास विभागाकडे आहेत. ठाकरे स्मारक ट्रस्टच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची नियुक्ती केली असून सुभाष देसाई हे सदस्य सचिव आहेत.
ट्रस्टच्या मागणीनुसार नगरविकास विभागाला लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हे खाते आहे. त्यांच्या आदेशानुसार ठेकेदार देऊ शकत नाही. एमएमआरडीए केवळ दुसरा आराखडा तयार करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला निर्देश देऊ शकते, अशी माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.