डोंबिवली, ४ जानेवारी : ठाणे जिल्ह्यात विशेषत: कल्याण डोंबिवली परिसरात पायाभूत प्रकल्प उभे राहात आहेत. त्यामुळे नवीन उद्योग सेवा सुरू करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. व्यावसायिकांनी याचा लाभ घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन वास्तुरेखाकार कौस्तुभ कशेळकर यांनी येथे काढले.
डोंबिवली नागरी सहकारी बँकेने श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी सभागृहात योजलेल्या व्यावसायिकांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मेट्रो रेल्वे, बुलेट ट्रेन, आय्.टी.हब या सारखे प्रकल्प आपल्या परिसरात उभारले जात असून आपल्या व्यवसायासाठी याचा लाभ कसा घेता येईल. या प्रकल्पासाठी कोणते पुरक उद्योग सुरू करता येतील याचा विचार आपण केला पाहिजे. आपल्या व्यवसायाला डोंबिवली बँक निश्चितच सहकार्य करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान बँकेचे सरव्यवस्थापक रमेश सिंग यांनी प्रास्ताविकात व्यावसायिकांच्या अडीअडचणीत बँक निश्चितच त्यांच्या पाठीशी उभी राहील असे सांगितले. बँकेच्या माजी उपाध्यक्षा कुलकर्णी यांनी बँकेच्या कामगिरीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे कोरोना काळात व्यावसायिकांसाठी सुरू केलेल्या विशेष कर्ज योजनांची माहिती दिली. बँक व व्यावसायिक मिळून अर्थव्यवस्थेला चालना देत असतात. रोजगार निर्मिती करत असतात. म्हणूनच आपण एकमेकांच्या सहकार्याने आर्थिक क्षेत्रात कार्यरत राहुया. कार्यक्रमात डोंबिवलीच्या क्लस्टर हेड शलाका प्रभू यांनी बँकेच्या विविध योजनांचे सविस्तर सादरीकरण केले. तसेच या मेळाव्यात काही निवडक जुन्या ग्राहकांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. या मेळाव्यात शेवटच्या शैक्षणिक वर्षात शिकणारे व स्वत:चा उद्योग सुरू करण्याची इर्षा बाळगणारे तरूणही मोठ्या संख्येने उपस्थित होते.