मनसेचं पुढचं आंदोलन बँकामधल्या मराठीसाठी : राज ठाकरेंचा इशारा
मुंबई : प्रत्येक राज्यात बँकेचा व्यवहार हा त्यांच्या प्रादेशिक भाषेमध्ये होतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा तसा नियमही आहे. त्यामुळे मनसेच पुढचं आंदोलन हे बँकांमधल्या मराठीसाठी असेल असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत दिला. दुकानांच्या पाट्या मराठी करण्यासाठी पून्हा एकदा आंदोलन सुरु करावं लागेल, कारण काही जण अजूनही सुधारलेले नाहीत, असेही राज म्हणाले.
राज ठाकरेंची ठाण्यात जाहीर सभा झाली. भाजपचे सरकार बिनडोक आणि डरपोक असल्याची टीका राज यांनी यावेळी केली. फेरीवाले, मराठी मुद्दासह बुलेट ट्रेन, समृध्दी महामार्ग आदींवरून त्यांनी सरकारला धारेवर धरलं. सर्व पक्ष फेरीवाल्यांच्या बाजूने आहेत. 2 हजार कोटी रुपयांचा फेरीवाल्यांकडून सरकारला हफ्ता जातो आणि त्यामुळे त्यांचा पुळका येतोय. मात्र सामान्य माणसाची चिंता कुणालाही नाही असे राज म्हणाले. सर्वच जण मनसेला एकटं पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मनसे कधीही एकटी पडणार नाही, कारण महाराष्ट्राची जनता मनसेसोबत आहे, असं राज ठाकरे म्हणाले. . मनसेचं प्रत्येक आंदोलन कायदा मोडणाऱ्यांविरोधात आहे. जे काम सरकारचं आहे, ते मनसेने करुन दाखवलं. जे लोकांना आवडलंय. मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले. मनसे कार्यकर्त्याला एक कोटींचं हमीपत्र मागितलं, असं म्हणत राज ठाकरेंनी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांचाही समाचार घेतला. पोलिसांवर हात उचलणा-यावर १ कोटीचा बॉण्ड मागा असेही राज यांनी सुनावले. मुंबई आणि ठाण्यातील अनधिकृत फेरीवाल्यांवरोधातील कारवाईवरून राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्र जातीपातींमध्ये गुंतलाय आणि आम्ही आमच्याच लोकांच्या विरोधात गुंतलोय. ज्याचा फायदा बाहेरुन येणारे घेत आहेत. पाकिस्तानी आणि बांगलादेशींचे मोहल्ले मुंबई आणि ठाण्यात कसे उभे राहतात? असा सवाल राज यांनी उपस्थित करून हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढे येण्याचं आवाहनही राज यांनी केलं.
भाजपचा ब्ल्यू फिल्म दाखवून प्रचार
गुजरातमध्ये व्हायरल केलेल्या हार्दिक पटेलच्या सीडीवरुनही त्यांनी भाजपला धारेवर धरलं. मनसेने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ब्ल्यू प्रिंट दाखवून प्रचार केला होता पण भाजप गुजरातमध्ये ब्ल्यू फिल्म दाखवून प्रचार करत असल्याची टीका राज यांनी केली. ज्या राहुल गांधींना भाजपवाले पप्पू म्हणायचे त्या राहुल गांधींचा सामना करण्यासाठी भाजपने फौज उतरवलीय असल्याचे राज म्हणाले.
आधी वाराणसी स्वच्छ करा, मग देशाच बघा
मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागतात. मुठभर लोकांसाठी बुलेट ट्रेनचा घाट घातला जातोय. बुलेट ट्रेनचा मुंबईला काहीच फायदा नाही. १ लाख १० हजार कोटीच कर्ज काढताय. हे प्रत्येक नागरिकांना फेडावं लागणार आहे. आणि ते ही गुजरातच्या लोकांसाठी अस म्हणत राज यांनी बुलेट ट्रेनचा विरोध बोलून दाखवला. स्वच्छ भारत करण्यासाठी निघेल्या मोदींनी आपल्या वाराणसी मतदारसंघ आधी स्वच्छ करा अशी टीका राज यांनी केली.
तर स्मृध्दी महामार्ग मध्येच तोडून
विदर्भाच्या विकासाला विरोध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातले आहेत. त्यांनी विदर्भाचा विकास करावा. मात्र मराठी माणसांना तोडण्याचं, विदर्भ वेगळा करण्याचं षडयंत्र असेल तर ते यशस्वी होऊ देणार नाही, अन्यथा महामार्ग बांधून वेगळं राज्य निर्माण करण्याचा विचार असेल तर महामार्ग मध्येच तोडू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.