ठाणे, 31 डिसेंबर – ठाण्यात घोडबंदर येथे आयोजित एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकून दोन आयोजकांसह सुमारे १०० जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच पार्टीत गांजा, चरस मिळून तब्बल आठ लाख रुपयांचे अमली पदार्थ आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेत. नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

अधिक माहिती अशी की, कासारवडवली भागातील सेंडोबा मंदिराजवळील खाडी किनारी रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. खाडीपासून ३०० मीटरच्या आतमध्ये हा परिसर आहे. गणेश राऊत हा या पार्टीचा आयोजन होता. रात्री १० च्या नंतर रेव्ह पार्टी सुरू झाली होती. पूर्ण जंगलाचा परिसर असल्याने कुणालाही याची खबर नव्हती. मात्र पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी रात्री ३ वाजता घटनास्थळी धाड टाकली. त्यात सुमारे १०० तरुणांना ताब्यात घेऊन अमली पदार्थही जप्त केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कासारवडवली पोलीस ठाण्यात सुरू आहे. या रेव्ह पार्टीचे आयोजन केल्यानंतर तरुणाईला सोशल मीडियावरून घटनास्थळाचा पत्ता पाठवण्यात आला होता. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरारोड अशा भागातून तरुण-तरुणी या ठिकाणी स्वतःच्या वाहनाने आले होते. घटनास्थळी २९ मोटारसायकली आणि गांजा पिण्याचे साहित्य आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याठिकाणी ९० पुरूष व ५ महिला या अंमली पदार्थाचे सेवन करून मद्यधुंद अवस्थेत डीजेच्या गाण्यावर नृत्य करीत असताना आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात ८,०३,५६० किंमतीचा ७० ग्रॅम चरस, एलएसडी ०.४१ ग्रॅम, एस्कैंटसी पिल्स २.१० ग्रॅम, गांजा २०० ग्रॅम, बिअर/वाईन/व्हिस्की, असा अंमली पदार्थ, मद्य साठा, डीजे मशिन, २९ मोटार सायकली जप्त केल्या आहेत. त्याबाबत एनडीपीएस अॅक्ट, महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

ठाणे गुन्हे शाखा उपायुक्त शिवराज पाटील, एसीपी, युनिट पाच आणि युनिट दोन यांच्याकडून संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक चौकशी केली जात आहे. दरम्यान ताब्यात घेतलेल्या तरुणांना पोलिसांनी पंचनामा करून वैद्यकीय तपासणीसाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात नेले आहे.

ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांची पत्रकार परिषद घेऊन या रेव्ह पार्टीची माहिती दिली. नवीन वर्षानिमित्ताने होणाऱ्या पार्ट्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश आम्हाला पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार आम्ही लक्ष ठेवून होतो. त्याचाच एक भाग म्हणून गुन्हे शाखेच्या पथकाने या रेव्ह पार्टीचा भांडाफोड केला आहे. खाडीलगत असणाऱ्या अंधाऱ्या भागात ही रेव्ह पार्टी सुरू होती. योग्य नियोजन करून तिथे आम्ही छापा टाकला. ड्रग्ज विकले जात होते आणि पार्टी सेलिब्रेशन केले जात होते. या पार्टीतील ९० तरुणांसह पाच तरुणींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या सर्वांवर एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

रेव्ह पार्टी आयोजित करणाऱ्या आयोजकांनी यापूर्वी अशी पार्टी आयोजित केली होती का? याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच हे ड्रग्ज नेमके कुठून आणले? याची माहिती घेण्यात येत आहे. तेजस कुबल हा या आयोजकांपैकी एक आहे. त्याला आणि आणखी एकाला आम्ही ताब्यात घेतले आहे. तेजस कुबल हा गोव्यात देखील अशा पार्ट्या आयोजित करत होता, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. यांना नेमकं कोण मदत करत होत याचीही चौकशी करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले. तसेच ज्या ठिकाणी रेव्ह पार्टी सुरू होती, त्या ठिकाणी आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *