डोंबिवली : महाराष्ट्रात तंबाखूजन्य गुटख्यावर कडेकोट बंदी असतानाही डोंबिवलीत पान मसाल्याचा साठा करणाऱ्या दुकानदाराकडून ६८ हजार ८४० रूपये किंमतीचा विमल पान मसाला हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या पथकाने केली. या प्रकरणी सरकारतर्फे पोशि शिरीष शिर्के यांच्या फिर्यादीवरून विष्णूनगर पोलिस ठाण्यात मनोज जगदीशप्रसाद गुप्ता (35, रा. लक्ष्मी सोहम बिल्डिंग, देवी चौक, डोंबिवली-पश्चिम) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी मनोज गुप्ता याने मानवी आरोग्यास अपायकारक व महाराष्ट्र शासनाने अधिसुचनेद्वारे माल वाहतुकीस व विक्रीस प्रतीबंधीत असलेला विमल पान मसाला खाणाऱ्या व्यक्तीवर घातक परिणाम होऊन त्याच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो, हे ज्ञात असतानाही त्याने प्रतिबंधित पान मसाल्याची विक्री करण्यासाठी आपल्या पान शॉपमध्ये विक्रीकरिता साठा करून ठेवला होता. हा साठा त्याने कुठून आणला ? तो कुणाला विकणार होता ? किरकोळ विक्री करणार होता की घाऊक विक्री करणार होता ? याचा चौकस तपास पोलिस करत आहेत.