मुंबई, दि. २८ः आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या ६ जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत. गुरूवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीवर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच मार्च महिन्यात आचारसंहिता लागणार असल्याने सर्वांनी निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल, असा अंदाज सी- वोटरने वर्तवला. महायुतीने त्यानंतर अधिक जागा निवडून आणण्याची रणनिती आखली आहे. भाजपने त्यानंतर राज्यव्यापी दौरा जाहीर केला. त्यापाठोपाठ शिवसेनेने देखील महाराष्ट्र दौऱ्याचे नियोजन केले आहे.

महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात यवतमाळ, वाशिममध्ये आणि रामटेक पासून होईल. या ठिकाणी ६ जानेवारीला पदाधिकारी मेळावा होणार आहे. ३० जानेवारीपर्यंत हा दौरा असणार आहे. यावेळी दोन दिवसाचे शिबीर देखील होईल. दरम्यान, शिंदे यांच्यासह प्रमुख नेत्यांची भाषणे होतील. त्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी तयारी करा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत.

महायुती ४८ जागा लढवणार असून ४५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट्ये आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांत, सोशल मिडीयातून येणाऱ्या बातम्यांकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन शिंदे यांनी केले. पाच राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात जनतेचा कौल असल्याचे सर्व्हे आले. परंतु, सगळ्यांचा अंदाज खोटा ठरवत तीन राज्यात भाजप बहुमताने निवडून आले. महाराष्ट्रात देखील अशीच कामगिरी होईल. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने निवडणुकीला सामोर जा, अशा सूचना शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्यव्यापी दौऱ्याची माहिती देताना, राम मंदिर लोकार्पण सोहळ्याप्रसंगी शिवसेनेकडून जंगी तयारी करणार असल्याचे सांगितले. रत्नागिरीत २१ आणि २२ जानेवारीला राम मंदिराचा उत्सव साजरा करण्यात येईल. या जिल्ह्यातील राम मंदिर आणि ग्राम मंदिरांमध्ये महाप्रसाद, रोषणाई आमि राम मंदिर उद्घाटनादिवशी ११ ते १ लाईव्ह कार्यक्रम ग्रामस्थांना दाखवला जाईल. ४ हजार ६०० ग्रामदैवतांची येथे देवळे आहेत. त्या मंदिरांना रोषणाई व महाप्रसाद ठेवला जाणार असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रभर असाच कार्यक्रम करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

असा असेल दौरा
६ जानेवारी यवतमाळ, वाशिममध्ये आणि रामटेक मेळावा
८ जानेवारी अमरावती आणि बुलढाणा
१० जानेवारी हिंगोली आणि धाराशीव
११ जानेवारी परभणी आणि संभाजीनगर
२१ जानेवारी शिरूर आणि माव़ळ
२४ जानेवारी रायगड रत्नागिरी सिधुदुर्ग
२५ जानेवारी शिर्डी आणि नाशिक
२९ कोल्हापूर ३० जानेवारी हातकंणगले त्यानंतर पक्षाचे दोन दिवसाचे शिबीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *