मुंबई : राज्यात दुष्काळ आणि अवकाळीमुळे शेतकरी संकटात असताना सरकारने मदतीच्या वारेमाप घोषणा केल्या. मात्र बळीराजा अद्याप मदतीपासून वंचित असून सरकारच्या घोषणा हवेत विरल्या आहेत, असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. मुंबईतील अजिंक्य तारा या शासकीय निवासस्थानी दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आदी मुद्द्यावर सरकारला घेरले. तसेच सरकारच्या धोरणांवर बोट ठेवत जोरदार टीकास्त्र सोडले.

राज्यात गेल्या ४८ तासांत दुष्काळ, सततची नापिकीमुळे त्रस्त ६ शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केल्या आहेत. सरकार सत्तेत आल्यापासून आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याच्या घोषणा करत आहेत. मात्र वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या घटना पाहता, सरकारने केलेल्या घोषणा कागदावर राहिल्या आहेत. मुख्यमंत्री यांच्या ठाणे जिल्ह्यात कुपोषणाचा दर उंचावला आहे. शेतकरी आत्महत्या, कुपोषण रोखण्यास सरकार अपयशी ठरल्याची टीका करताना दानवे यांनी शासन आपल्या दारी की, कंत्राटदार उद्योजकाच्या दारी असा चिमटा काढला. उद्योग विभागाच्या प्रसिद्धीवरूनही खडे बोल सुनावले. देशातील महागाई, बेरोजगारी, भ्रष्ट्राचाराचा मुद्दा, सर्व समान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यात भाजप अपयशी ठरला आहे. त्यामुळे राम मंदिराचा भावनिक मुद्दा पुढे आणला जात आहे, असा आरोप दानवे यांनी केला.

आमदार अपात्रतेचा निकाल जानेवारीच्या १० तारखेपर्यंत अपेक्षित आहे. शिवसेनेतील अनेक आमदार आणि खासदार त्यानंतर भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील. भाजप मात्र त्या उमेदवारांना गिळून टाकेल, असा दावा दानवे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *