मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदार संघावर शिवसेनेने (ठाकरे) दावा केला असून उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सोमवारी मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख (ठाकरे) उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. मावळ मतदार संघाबाबत आढावा घेण्यात आला.
लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने मतदार संघाची बांधणी करण्यावर राजकीय पक्षांनी जोर दिला आहे. आढावा बैठका, रणनीती आणि डावपेच आखण्यात येत आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसंदर्भात तयारी सुरू केली आहे. मावळमधून शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे निवडून आले होते. पक्षातील फुटीनंतर बारणे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मावळ मतदार संघावर ठाकरे यांनी दावा करत तगडा उमेदवार देण्याची चाचपणी सुरू केली आहे. आमदार सचिन अहिर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
अहिर म्हणाले की, मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना (ठाकरे) उमेदवार देईल. आमच्या पक्षाचा उमेदवार कोण असेल याचा निर्णय लवकरच होईल. पण ही जागा जिंकून आणण्याबाबतची चर्चा बैठकीत झाली. मावळ मधून लढण्यासाठी शिवसेनेत आणि शिवसेने बाहेरील अनेक लोक इच्छुक आहेत. काही आमच्या संपर्कात देखील आहेत. त्यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः लवकरच बोलतील. मात्र, मावळमधून जो उमेदवार दिला जाईल, त्याला बहुमताने निवडून आणण्याचे आमचे काम असेल, असा विश्वास शिवसेना नेत्यांनी ठाकरे यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशातील इंडिया आणि राज्यातील महाविकास आघाडीत ‘वंचित बहुजन आघाडी’चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या प्रवेश याबाबतचा निर्णय पक्षातील आणि महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते घेतील, असे ते म्हणाले.