डोंबिवली : ऑनलाईनच्या माध्यमातून नोकरीचे आमिष दाखवून तिघा भामटयांनी एका तरूणाकडून सुमारे ९ लाख ८७ हजार रूपये उकळून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत ऑनलाईन व्यवहारातून ही फसवणूक झाली आहे सुमीत वार्ष्णेय ( २८) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे. सुमीत हा नोकरी करतो. तर त्यांनी शायला, प्रियंका, पवनकुमार या तिघांविरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
सदर आरोपींनी सुमीतला विविध साधने पाठवून ते टप्पे पूर्ण करण्याचे लक्ष्य दिले. ते टप्पे पूर्ण करत असताना आरोपींनी सुमीतकडून टप्प्याने एकूण ९ लाख ८७ हजार रूपये वसूल केले. ही रक्कम त्यांनी ऑनलाईन माध्यमातून वसूल केली. टप्पे पूर्ण केल्यानंतर सुमीत आरोपींकडे नोकरीची मागणी करू लागला. त्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन नंतर संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. आपली ऑनलाईन माध्यमातून भामट्यांनी फसवणूक केली म्हणून तक्रारदाराने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.