डोंबिवली : गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण पथकाने डोंबिवलीत दाखल झालेल्या दोघा सराईत तडीपार गुंडांना अटक केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एका गुंडाला चॉपरसह जेरबंद केले. तर तडीपार कायद्याचे उल्लंघन करून शहरात दहशत पसरविण्यासाठी दाखल झालेल्या या दोन्ही गुडांना जेरबंद करण्यात यश आले आहे
डोंबिवली पूर्वेकडील ठाकुर्ली रोडला असलेल्या बंदिश चौकात आतिश राजू गुंजाळ (24, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, शेलारनाका, डोंबिवली-पूर्व) हा सराईत गुंड चॉपरचा धाक दाखवून परिसरात दहशत माजवत असल्याची माहिती हवा. दत्ताराम भोसले यांना मिळाली होती. त्यानुसार वपोनि नरेश पवार, पोनि राहूल मस्के, सपोनि संदीप चव्हाण, पोउपनि संजय माळी, हवा. दत्ताराम भोसले, हवा. बापूराव जाधव, बालाजी शिंदे, रविंद्र लांडगे, किशोर पाटील, सचिन वानखेडे, अनुप कामत आणि विनोद चन्ने या पथकाने गुंडाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून जीवघेणा चॉपर हस्तगत करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आतिश गुंजाळ याच्या विरोधात अपहरण, अंमली पदार्थांची खरेदी-विक्री, घातक शस्त्राचा वापर करण्यात सामन्यांत दहशत माजविण्याचे ५ गुन्हे दाखल आहेत. या गुंडाला दोन वर्षांकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.
याच पथकाने गणेश अशोक अहिरे (22, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, शेलारनाका, डोंबिवली-पूर्व) या सराईत गुंडालाही अटक केली. रामनगर आणि टिळकनगर पोलिस ठाण्यात या गुंडाच्या विरोधात चोरी, घातक शस्त्र जवळ बाळगणे, गंभीर दुखापत करणे अशा प्रकारचे ३ गुन्हे दाखल आहेत. हा गुंड डोंबिवली जिमखान्याजवळ आल्याची माहिती हवा. दत्ताराम भोसले यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने घटनास्थळी जाऊन गुंडाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान या गुंडाच्या हातून कोणतातरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्याची शक्यता होती.