महिलेच्या तक्रारीवरून गुंतवणूक सल्लागारावर गुन्हा दाखल !

कल्याण : कल्याण पश्चिमेतील चिकणघर भागातील एका महिलेला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून अधिकचा परतावा देण्याचे आमिष दाखवून याच भागातील एका गुंतवणूक सल्लागाराने महिलेची १८ लाख ५६ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी महिलेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. 

वृषाली शैलेश धामणकर (४७) असे तक्रारदार महिलेचे नाव असून त्या चिकणघर भागातील मंगेश सहारा कॉम्प्लेक्समध्ये राहतात. आरोपी दीपक भागवत पाटील (३२) हा याच भागातील राधाकुंज सोसायटीत राहत असून तो गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करतो.

या बाबतीत पोलिसांनी सांगितले की, मागील तीन वर्षाच्या काळात आरोपी दीपक पाटील यांनी तक्रारदार वृषाली धामणकर यांना संपर्क करून त्यांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. या गुंतणुकीतून चांगला परताना मिळवून देण्याचे आमिष दाखविले. कमीत कमी वेळात चांगली रक्कम हातात मिळणार असल्याने वृषाली यांनी जवळील १८ लाख ५६ हजार रूपये टप्प्या टप्प्याने आरोपी दीपक यांना गुंतवणुकीसाठी दिले. तीन वर्ष झाल्यानंतरही पाटील यांच्याकडून गुंतवणुकीवर परतावा मिळत नाही म्हणून वृषाली यांनी गुंतवणूक रक्कम व्याजासह परत देण्याची मागणी पाटील यांच्याकडे सुरू केली. वेळोवेळी ते उडवाउडवीची उत्तरे देऊन वृषाली यांना रक्कम परत करण्यास टाळाटाळ करत होते. पाटील यांनी आपल्या रकमेचा अपहार केला आहे याची खात्री पटल्यावर वृषाली यांनी दीपक पाटील विरूध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुरूवारी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *