मुंबई : माझ्या पुतण्यावर मी विश्वास दाखवला, परंतु तुम्ही ज्या भावाबरोबर लहानाचे मोठे झालात, त्याच्यावर थोडा तरी विश्वास दाखवायला हवा होता, असा खोचक टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावित आताही भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा, मग आम्हीपण आभार मानू, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्यालालबाग येथील शाखेच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या. त्यामुळे या टीकेवर उध्दव ठाकरे काय उत्तर देणार, राज उद्धव एकत्र येणार का? उद्धव ठाकरे आपल्या वहिनीचा शब्द राखणार का ? अशा चर्चेना उधाण आलय.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी स्थापन एसआयटी चौकशीवरून शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली होती. उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले होते. शर्मिला यांना उद्धव ठाकरे यांच्याबाबत छेडले असता, त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. माझ्या पुतण्यावर मी विश्वास दाखवला. परंतु, उद्धव ठाकरे यांनी मला आयुष्यात आभार मानायची कधीच संधी दिली नाही. किणी केस प्रकरणावरून सातत्याने चिमटे काढले. तुमच्या सोबत जो भाऊ लहानाचा मोठा झाला, त्याच्यावर थोडा विश्वास दाखवायला असता तर आम्हाला आभार मानायची संधी मिळाली असती. आताही भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा, मग आम्हीपण आभार मानू, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
मराठा समाजाला आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर हिवाळी अधिवेशनात विरोधक आरक्षणाची मागणी करत आहेत. सरकार असताना आरक्षणाचे विधेयक विधानसभेत मंजूर केले नाही. उलट कोरोनाच्या नावाने खडे फोडत आहेत. मात्र, मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. सत्ताधारी किंवा विरोधकांनी त्यावेळी आरक्षण का दिले नाही, असा सवाल शर्मिला यांनी विचारला.