कल्याण-: कल्याणातील पाच चिमुरडयांनी सर्वात कठीण समजला जाणारा मलंग गड दोरखंडाने सर केला आहे. श्राव्या भोसले (वय ४ वर्षे), साक्षी हिप्परकर (वय ४ वर्षे), ईशान पासवान (वय १० वर्षे), नंदिनी थोपटे (वय १० वर्षे), सृजन धर्माधिकारी (वय ८ वर्षे) अशी या साहसी चिमुरडयांची नावे आहेत. सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या गिर्यारोहण संघाच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी मलंगगडावर यशस्वी चढाई केली आहे. चिमुरडयांच्या साहसाचे कौतुक होत आहे.

मलंगगड म्हणजे माथेरानच्या डोंगररांगेमध्ये वसलेला गड. समुद्रसपाटीपासून मलंगगडाची उंची तीन हजार दोनशे फूट उंच आहे. शिलाहार राजाने निर्माण केलेला हा तत्कालीन कालखंडात फक्त आजूबाजूच्या परिसरावर लक्ष देण्यासाठी बनवला गेला होता.कल्याणच्या दक्षिणेपासून अवघ्या सोळा किलोमीटर अंतरावर हा गड आहे. पनवेल-वावंजे गावापासून हा किल्ला दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे. बदलापूरच्या नैऋत्येस व मुंबई आणि साष्टीच्या पूर्वेस हा किल्ला आहे. करंजा, उरणच्या नैऋत्येस आणि बोरघाट, भीमाशंकर व माळशेज घाट पूर्वेस असा हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा किल्ला होता.

श्री मलंगगड म्हंटल तर माथा गाठण्यासाठी करावी लागते ती अगणिक मेहनत. सुमारे दोन तासांची चढाई आणि भितीवर मात करण्याची मानसिक तयारीची आवश्यकता ! कारण गडाचा माथा गाठण्यासाठी हजारो फुटांवर असलेल्या अगदी एकच पायाला जागा ठेवता येइल अश्या पाइप वरून जाण्याची वाट. आणि किंचित ही पाय निसटला तर भीती असते ती हजारो फूट दरीत कोसळण्याची. अशा कठिण परिस्थितीत मोठया साहसाने चिमुरडयांची मलंगगडावरील चढाई अवाक करणारी ठरली आहे.

सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाच्या वतीने दर्शन देशमुख, रणजित भोसले,पवन घुगे,भूषण पवार,सुनील खणसे,संजय कारे,प्रशिल अंबादे,अभिषेक गोरे,आणि सुहास जाधव ह्यांनी तांत्रिक सहकार्य आणि मानसिक सहकार्य करून मोहीम यशस्वी करून दाखवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *