डंपिंगवरील कचरा प्रक्रिया करूनच उचला, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांचा केडीएमसीला इशारा

कल्याण दि.१८ डिसेंबर : कल्याण पश्चिमेतील वाडेघर डंपिंग ग्राउंडच्या मुद्द्यावरून कल्याण शहर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या डंपिंग ग्राऊंडवरील कचरा उचलण्याचे काम सध्या सुरू असून शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून कचरा उचलला न गेल्यास उग्र आंदोलनाचा इशारा भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी दिला आहे. स्थानिकांच्या तक्रारीनंतर डंपिंग ग्राऊंडवर सुरू असणाऱ्या या कामाची स्थानिक लोकप्रिनिधी आणि भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी आज पाहणी केली. त्यावेळी कोणतीही शास्त्रोक्त प्रक्रिया न करता हा कचरा उचलला जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

कल्याण पश्चिमेतील वाडेघर डंपिंग ग्राउंड हे कल्याण पश्चिमेतील नागरिकांसह गेल्या अनेक वर्षांपासून केडीएमसीच्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासाठी नेहमीच अडचणीचा विषय ठरला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या डंपिंगवर कचरा टाकणे बंद झाले असून शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याचा हा डोंगर हटवण्यात येईल असे केडीएमसी प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. त्यानुसार या डंपिंग ग्राऊंडवरील कचरा उचलण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. मात्र शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून कचरा उचलण्याच्या आश्वासनाचा बहुधा केडीएमसी प्रशासनाला विसर पडला आहे. त्यामुळे डंपिंग ग्राउंडच्या परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात दुर्गंधीची समस्या भेडसावू लागल्याचे भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी सांगितले. जर अशाच प्रकारे कचरा उचलयाचा होता तर मग इतके वर्षे हे काम का नाही झाले असा संतप्त सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे.

डंपिंग ग्राउंडशेजारील विद्यार्थी आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

डंपिंग ग्राऊंडवर थेट पोकलन- डंपरच्या माध्यमातून कचरा उचलला जातोय आणि दुसरीकडे जशाच्या तसा टाकला जात आहे. परिणामी डंपिंग ग्राउंडशेजारील भागातील विद्यार्थी आणि नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तर हा कचरा ज्याठिकाणी टाकला जातोय तिथल्या लोकांच्या अरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. या पार्श्वभमीवर केडीएमसी प्रशासनाने शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करूनच हा कचरा उचलावा अन्यथा उग्र आंदोलन करू असा इशारा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजपचे शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *