नाशिक ( प्रतिनिधी) : अयोध्या येथे दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग तर्फे दिनांक २० डिसेंबर ते  २२ जानेवारी २०२४ या कालावधीत ११ कोटी श्री राम रक्षा व हनुमान चालीसा सामुदायिक पठन केले जाणार आहे अशी घोषणा सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरु​माऊली श्री अण्णासाहेब मोरे यांनी केली तेव्हा उपस्थित हजारो सेवेकरांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट करून आणि जयजयकाराच्या घोषणा देऊन गुरुमाऊलीना प्रतिसाद दिला.

श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथील गुरुपिठामध्ये शनिवारी राज्याभरातून आलेल्या सेवेकरांना परमपूज्य गुरु माऊलींनी संबोधित केले. ते म्हणाले की, अयोध्या येथे दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे.या निमित्ताने सेवा मार्ग तर्फे अकरा कोटी हनुमान चालीसा आणि अकरा कोटी रामरक्षा स्तोत्राचे सामुदायिक पठण केले जाणार आहे. जगभरातील सेवेकरांनी या सामुदायिक पठण कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

जगभर राम राज्य यावे आणि जगातील दैन्य दुःख दारिद्र्य दूर होऊन जनता सुखी व्हावी व होऊ घातलेल्या कार्यक्रम सुरळीत संपन्न व्हावा या उद्देशाने सामुदायिक पठनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या सुरू असलेल्या मल्हारी षद रात्रोत्सवा संदर्भात बोलताना ते म्हणाले की,या काळामध्ये जास्तीत जास्त मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पठण करावे आणि देवाला चंपाषष्ठी ला भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवून सांगता करावी.

सेवा मार्गातर्फे दिनांक २० ते २७ डिसेंबर २०२३ या काळात श्री दत्त जयंती निमित्त नाम यज्ञ सोहळा हजारो सेवा केंद्रांमध्ये होणार आहे .या सप्ताहातील विविध सेवांची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखाव्यात बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा सर्वांपर्यंत सेंद्रिय शेतीचे ज्ञान पोहोचावे अशा उद्देशाने दिनांक २४ ते २७ जानेवारी २०२४ या काळात नाशिकच्या डोंगरे मैदानावर जागतिक कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला असून या उपक्रमात शेतकरी नागरिक व समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

सर्वांचे आरोग्य निरामय राहावे आणि गरजूंवर उपचार व्हावेत या उद्देशाने सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या कामाला आता लवकरच सुरुवात होणार असून बांधकामाची पायाभरणी झाली आहे अशी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

 अयोध्या येथील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशान्वये मुंबई विभागातर्फे मुंबई येथे दिनांक १३ जानेवारी रोजी सामुदायिक श्री राम रक्षा स्तोत्र व हनुमान चालीसा पठणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला असून या उपक्रमाला मुंबई विभागातील सेवेकरांनी उपस्थित राहून श्रींच्या चरणी सेवा समर्पित करावी असे गुरुमाऊलींनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *