तुकारामनगरमध्ये लाखो लीटर पाण्याची नासाडी : कारंजे बंद, पण बनलय पाण्याचे डबक
डोंबिवली : पूर्वेतील तुकारामनगर परिसरातील स्वामी विवेकानंद शाळेजवळ लाखो रूपये खर्चून कारंजे साकारण्यात आले आहे. मात्र अनेक वर्षापासून इथले कारंजे बंद असले नळाचे पाणी मात्र सुरूच आहे. त्यामुळे दररोज लाखो लीटर पाण्याची नासाडी होत असून या पाण्याचे डबके बनलं आहे. साचलेल्या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. मनसेचे विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेथे यांनी पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी अनेकवेळा महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे पाठपुरावा केलाय. जेव्हा तक्रार केली जाते तेव्हा पालिकेकडून तात्पुरता नळ बंद केला जातो. पण काही दिवसानंतर इथला नळ पून्हा सुरू जातो. लाखो रूपये खर्च करून कारंजे सुरू करण्यात आले पण एक दिवसही हे कारंजे सुरू झालेले नाहीत. कारंजे बंद असल्याने सतत नळातून पाणी पडत असल्याने कारंज्याला डबक्याचे स्वरूप आलय. या पाण्यात पहाटे रिक्षा धुतल्या जात आहेत. तसेच हे पाणी रस्त्यावर येत असल्याने गाडया स्लीप होऊन अनेकवेळा अपघातही झाले आहेत असे जेथे यांनी सांगितलं. गेल्या वर्षीही हा नळ बंद केला हेाता पण राजकीय दबावापोटी पून्हा सुरू केला जातो. एकिकडे तुकारामनगरवासियांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसताना दुसरीकडे मात्र लाखो लीटर पाणी वाया जातय. त्यामुळे हा नळ कायमचा बंद करावा व लाखो लीटर पाण्याची नासाडी थांबवावी अन्यथा मनसेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही जेथे यांनी दिलाय.