लोकसभेचे १४ व राज्यसभेच्या एका खासदाराचा समावेश

नवी दिल्ली, १४ डिसेंबर : संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीवरून सभागृहात गोंधळ घालणाऱ्या १५ खासदारांना निलंबित करण्यात आलेय. यामध्ये लोकसभेचे १४ आणि राज्यसभेच्या एका खासदाराचा समावेश आहे. संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याबद्दल लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ही कारवाई केलीय.

संसदेच्या सुरक्षेत घडलेल्या गंभीर चुकीमुळे विरोधकांनी आज, गुरुवारी संसदेत प्रचंड गोंधळ घातला. संसदेच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी लोकसभेतील 14 आणि राज्यसभेतील एका खासदारावरलोकसभा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली आहे. हे निलंबन संपूर्ण अधिवेशनासाठी लागू असेल. निलंबन करण्यात आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेसच्या ५ खासदारांचा समावेश आहे.

यानंतर संसदेचे कामकाज उद्यापर्यंत तककूब करण्यात आले. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी खासदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला होता. सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सुरुवातीला काँग्रेसच्या टीएन प्रतापन, हिबी इडन, जोतिमणी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोस यांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतरही गदारोळ थांबला नाही, म्हणून लोकसभा अध्यक्षांनी आणखी 9 सदस्यांना हिवाळी अधिवेशनातून निलंबित केले. यामध्ये बेनी बेहानन, मोहम्मद जावेद, पीआर नटराजन, कनिमोझी, व्हीके श्रीकंदन, के सुब्रमण्यम, एसआर पार्थिबन, एस वेंकटेशन आणि मणिकम टागोर यांचा समावेश आहे.

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत म्हटले की, बुधवारी 13 डिसेंबर रोजी घडलेली दुर्दैवी घटना ही लोकसभा सदस्यांच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटी होती आणि लोकसभा अध्यक्षांचे निर्देशानुसार या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या मुद्द्यावर कोणत्याही सदस्याकडून राजकारण अपेक्षित नाही. पक्षीय राजकारणाच्या वरती जाऊन काम करावे लागेल असे त्यांनी सांगितले.

राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ करायला सुरुवात केली. विरोधी पक्षांचे काही सदस्य वेलमध्ये आले. धनखड यांनी त्यांना समजावण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र विरोधकांचा गदारोळ वाढतच गेला. अखेर सभापती भडकले आणि बोट दाखवत उभे राहिले. काल लोकसभेत झालेल्या सुरक्षेतील चुकीसंदर्भात चर्चा करण्याची विरोधी पक्षांच्या सदस्यांची इच्छा होती.यानंतर, काही वेळातच सभापती धनखड यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांना या सत्राच्या उरलेल्या कालावधीसाठी सस्पेंड केले. त्यांच्यावर, राज्यसभेच्या कामकाजात व्यत्यय आणल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!