मुंबई, १४ डिसेंबर : ”मुलगी शिकली प्रगती झाली” अशा पाट्या जागोजागी आपण पाहतो. हे आशादायी चित्रं कितपत खरंय हा मात्र संशोधनाचा विषय आहे. वरकरणी जरी स्त्रिया आज बंधमुक्त असल्या तरी कधी समाज-संस्कृती तर कधी घराण्याची मानमर्यादा-इभ्रत अशा बेगडी प्रतिष्ठांना सर्रास बळी पडताना दिसतात. त्यात शहरी-निमशहरी सगळ्याचजणी भरडल्या जातात. अशाच एका विषयाकडे मनोरंजनाच्या माध्यमातून अगदी हलक्या-फुलक्या पद्धतीने लक्ष वेधण्याचा निरामि फिल्म्सने प्रयत्न केला आहे. मिलिंद इनामदार दिग्दर्शित ”सोंग्या” हा चित्रपट १५ डिसेंबरपासून चित्रपटगृहात दाखल होत आहे.

दिपक यादव यांनी लिहिलेली ही संवेदनशील कथा शुभ्रा आणि यशराज या दोन प्रेमी युगुलांवर आधारित आहे. या दोघांच्या अनुषंगाने खुलत जाणारी ही प्रेमकथा जुनाट रूढी-परंपरांच्या विळख्यात अडकते. समाजाला शरण न जाणारी शुभ्रा आपल्यावरील अन्याय सहन तर करत नाहीच पण ती अशा रूढींविरोधात आवाज उठवते. आपल्या पारंपरिक भारुडांच्या माध्यमातून जनजागृती करणारी प्रातिनिधिक स्वरूपातील शुभ्रा हे पात्र असंख्य मुलींचे बळी जाण्यापासून वाचवू शकते अशी निर्माते-दिग्दर्शक मिलिंद इनामदार यांना आशा आहे. चित्रपटाच्या अनुषंगाने विविध गाण्यांची ”सोंग्या” मध्ये रेलचेल असून ”दादा झाले अध्यक्ष, त्यांचं दिल्लीवर लक्ष” हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. मनोरंजनासोबतच मौलिक संदेश देणारा ”सोंग्या” सर्वांनी आवर्जून पहावा असाच झालाय.

”सोंग्या” चित्रपटातील मुख्य भूमिकेत ऋतुजा बागवे, अजिंक्य ननावरे, गणेश यादव, अनिल गवस, प्रदीप डोईफोडे आदि कलाकार दिसणार आहेत. निशांत काकिर्डे, राहुल पाटील, मिलिंद इनामदार ‘सोंग्या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे गीतलेखन गुरु ठाकूर यांनी केले आहे. संगीत विजय गवंडे यांचे आहे. आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, मनिष राजगिरे, योगेश चिकटगावकर, स्वप्नजा लेले, अमिता घूगरी यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. छायांकन अरविंद कुमार तर संकलन निलेश गावंड यांचे आहे.

स्त्रीशक्तीचा जागर करणारा ”सोंग्या” हा चित्रपट सामाजिक परिस्थितीवर भाष्य करीत जळजळीत अंजन घालतो असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ब्रेकिंग न्यूज

error: Content is protected !!