ठाणे ( अविनाश उबाळे ) : भिवंडी लोकसभा निवडणुक लढविण्यास काँग्रेस कमजोर असून सदर जागा इंडिया आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असल्याच्या निराधार बातम्या रोज पेरल्या जात असल्या तरी भिवंडी लोकसभा ही कॉंग्रेसपक्षच लढवणार असून केवळ लढण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी काँग्रेस पक्ष सक्षम असल्याचे ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी सांगितले.

काँग्रेस पक्ष भिवंडी लोकसभा न लढविता इंडिया आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस आयात उमेदवार घेऊन निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या येत असून याबाबत पत्रकारांनी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांना विचारले असता त्यांनी ही जागा काँग्रेस पक्षच लढवणार असल्याचा पुनरुच्चार केला.

ते पुढे म्हणाले की काँग्रेस पक्षाच्या कोकण विभाग आढावा बैठकीत भिवंडी लोकसभेची जागा काँग्रेस पक्षालाच अनुकूल असून ही जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसनेच लढवावी अशी आग्रही मागणी दयानंद चोरघे यांनी केली असता प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आघाडी होवो अथवा न होवो भिवंडी लोकसभेची जागा काँग्रेस पक्ष सोडणार नाही असे अभिवचन कार्यकर्त्याना दिले होते.

तर लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेस तर्फे समन्वयक म्हणून आलेले माजी मंत्री विश्वजित कदम,सह समन्वयक राजेश शर्मा यांनीही भिवंडी येथे झालेल्या बैठकीत काँग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीत ही जागा मित्र पक्षांना सोडणार नसल्याचे सांगितले आहे शिवाय विधिमंडळ पक्ष नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भेटीतही या विषयावर चर्चा झाली असता भिवंडी लोकसभा काँग्रेस पक्षच लढवणार असल्याने कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचे दयानंद चोरघे यांनी सांगितले आहे.

ओबीसी समाज व मुस्लिम समाज हा काँग्रेस पक्षाला अनुकूल असून ठाणे ग्रामीण मध्ये राबवलेल्या विविध उपक्रमामुळे काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढला आहे.तसेच काँग्रेस पक्षाला उमेदवार आयात करण्याची गरज नसून काँग्रेसमध्ये सक्रिय काम करणाऱ्यालाच उमेदवारी मिळणार असल्याचे चोरघे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातुन काँग्रेस कोणत्या जागा लढवणार आहे याची यादी दिल्लीत हायकमांडकडे गेली असून त्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा समावेश असल्याचे दयानंद चोरघे यांनी सांगितले असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीच अशा चुकीच्या व निराधार बातम्या पेरल्या जात असून या बातम्यांवर विश्वास न ठेवता पक्ष श्रेष्ठीनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या सूचना मला दिल्या असून जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुध्दा या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असे मी आवाहन करत असल्याचे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *