डोंबिवली : कल्याण पूर्वेतील एका नोकरदाराला पाच जणांच्या टोळक्याने दिराम या विदेशी चलनाचे आमीष दाखवून त्यांच्याकडून पाच लाख रूपये लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्याबदल्यात नोकरदाराच्या हातावर विदेशी चलनाऐवजी कापडी पिशवीत जुने रद्दी पेपर गुंडाळून देऊन लुटारूंनी तेथून पळ काढला. डोंबिवली जवळच्या कोपर रेल्वे स्थानकाच्या बाहेर हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. शैलेंद्र चव्हाण (४७) असे फसवणूक झालेल्या नोकरदाराचे नाव आहे. ते कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात राहतात. चार पुरूष आणि एक महिला अशा टोळक्याने चव्हाण यांची फसवणूक केली आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात चव्हाण यांनी तक्रार दाखल केली आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, पाच जणांनी मिळून तक्रारदार शैलेंद्र चव्हाण यांचा विश्वास संपादन केला. त्यांना पाच लाख रूपये किंमतीचे दिराम हे विदेशी चलन भारतीय चलनाच्या बदल्यात देण्याचे कबूल केले. विदेशी चलन मिळते म्हणून चव्हाण यांनी पाच लाख रूपये भारतीय चलनातील देण्याचे आरोपींना कबुल केले. कोपर रेल्वे स्थानका जवळ आरोपींनी चव्हाण यांना सोमवारी बोलावून घेतले. त्यांच्याकडून भारतीय चलनातील पाच लाख रूपये काढून घेऊन विदेशी चलनाच्या नावाखाली जुने रद्दी पेपर गुंडाळलेली एक कापडी पिशवी चव्हाण यांच्या हातात आरोपींनी ठेवली. त्यांना थोडा वेळ बोलवण्यात गुंतवून ठेवले. ही पिशवी घरी गेल्यावर उघडा, असा सल्ला आरोपींनी तक्रारदाराला दिला. पिशवी उघडण्यापूर्वीच आरोपींनी तेथून हळूच पळ काढला. चव्हाण यांनी तेथेच पिशवी उघडली. त्यावेळी विदेशी चलनाऐवजी त्यात जुने रद्दी पेपर गुंडाळलेले आढळून आले. चव्हाण यांनी कोपर रेल्वे स्थानक परिसरात आरोपींचा शोध घेतला. ते पळून गेले होते. विष्णुनगर पोलीस या भामट्यांचा शोध घेत आहेत.
तोतया पोलिसांनी सोन्याची चेन लुटली
साहेबांची चेकिंग सुरू आहे, तुमची सोन्याची चेन बॅगेत ठेवा, असे सांगून तिघा तोतया पोलिसांनी विजय चिंधा पाटील (५७, रा. ओम सिद्धी सोसायटी, गांधारी रोड, कल्याण-पश्चिम) या शिक्षकाकडील १५ ग्रॅम वजनाची ५० हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन घेऊन पलायन केले. थोड्यावेळाने बॅग तपासली असता विजय पाटील यांना त्यात सोन्याच्या चेन ऐवजी दगड आणि मातीने भरलेली पुडी आढळून आली. हा प्रकार काटई-बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या खोणी गावाजवळील कनका लॉजसमोर सोमवारी दुपारी २.३५ च्या सुमारास घडला. या प्रकरणी शिक्षक विजय पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फौजदार शाहू काळदाते आणि त्यांचे सहकारी फरार तिघा भामट्यांचा शोध घेत आहेत.