१७ डिसेंबरला होणार मॅरेथॉन.. जमा होणारा सर्व निधी सजग सामजिक संस्थेला देणार
कल्याण : अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत देशातील दर्जेदार अर्ध मॅरेथॉन स्पर्धा असा नावलौकिक प्राप्त केलेल्या कल्याणच्या आयमेथॉन ४ मध्ये यंदाही रेकॉर्डब्रेक धावपटू सहभागी होणार आहेत. या आयमेथॉनला अद्याप १० दिवस शिल्लक असतानाच तब्बल ३ हजार ५०० धावपटूंनी या स्पर्धेसाठी नावनोंदणी केली आहे. येत्या १७ डिसेंबर २०२३ रोजी ही आयमेथॉन ४ स्पर्धा होणार असून त्याद्वारे जमा होणारा सर्व निधी हा समाजातील वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या सजग संस्थेला दिला जाणार आहे. या आयमेथॉन ४ बाबत आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांतर्फे ही माहिती देण्यात आली.
या चार गटांमध्ये होणार स्पर्धा …
इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण रनर्स ग्रुपतर्फे गेल्या ३ वर्षांपासून ही आयमेथॉन अर्ध मॅरेथॉन स्पर्धा घेतली जात आहे. विशेष म्हणजे पहिल्या स्पर्धेपासूनच या आयमेथॉनमध्ये हजारांच्या संख्येमध्ये धावपटूंनी सहभाग घेतला आहे. २१ किलोमीटर, १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. तर या स्पर्धेसाठी केवळ कल्याण, डोंबिवली, ठाणे , मुंबई परिसरासह पंजाब, केरळमधील धावपटूंनी नाव नोंदणी केली आहे. तर ७६ दिवसांत कन्याकुमारी ते काश्मिर अशी देशाची दोन टोकं धावणारे दिग्गज धावपटू आशीष कसोदेकर आणि नऊवारी साडी नेसून बर्लिन मॅरेथॉनमध्ये गिनीज बुक रेकॉर्ड करणाऱ्या क्रांती साळवी स्पर्धकांचा उत्साह वाढवायला उपस्थित राहणार आहेत.
दुर्गाडी येथील रिंगरोडवरून होणार सुरुवात…
२१, १० आणि ५ आणि तीन अशा गटात होणाऱ्या या स्पर्धेला दुर्गाडी चौकाजवळ असलेल्या रिंगरोड परिसरातून सुरुवात होणार आहे. दुर्गाडी चौक, आधारवाडी चौक, गांधारी रिंगरोड, संदीप हॉटेल, प्रेम ऑटो सर्कल, मोहने उड्डाणपूल या मार्गावर हे धावपटू धावतील. तसेच या सर्व मार्गांवर प्रत्येक ठिकाणी ठराविक अंतराने डॉक्टरांची एक टीम अँब्युलन्ससह तैनात असणार आहेत. तर ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या महिला आणि पुरुष धावपटूंसाठी दुर्गाडी चौकात फिजिओथेरपीजची सुसज्ज टीम उपलब्ध असणार आहे. तर कल्याणातील ४०० डॉक्टरही या अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.
आयमेथॉनमधून मिळणारा निधी सामाजिक संस्थेला…
या स्पर्धेतून मिळणारे सर्व उत्पन्न हे समाजातील वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या कल्याणातील सजग सामाजिक संस्थेला दिले जाणार आहे. ही संस्था रिक्षा चालकांची मुले, शाळा अर्धवट सोडलेली मुले आणि शिक्षणापासून वंचित मुलांना शिकवण्याचे काम करत आहे. तर कल्याणकर नागरिकांनी ही स्पर्धा बघायला येऊन सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन यावेळी आयोजकांकडून करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला आयएमए कल्याणच्या अध्यक्ष डॉ. ईशा पानसरे, उपाध्यक्ष डॉ.सुरेखा ईटकर, माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, सचिव डॉ. विकास सूरंजे, वरिष्ठ सदस्य डॉ. अश्विन कक्कर डॉ. राजेश राघव राजू यांच्यासह कल्याण रनर्स ग्रुपचे समीर पाटील, सचिन सालीयन उपस्थित होते.