कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
डोंबिवली : खोटी बतावणी करून लोकांना बोलण्यात गुंतवूण त्यांच्या कडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेवून फसवणूक करणाऱ्या दोघा सराईत लुटारूंना गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण शाखेने जेरबंद केले आहे. या दुकलीकडून आतापर्यंत ६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून ३ लाख ७३ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी सांगितले. नरेश विजयकुमार जैसवाल (४०, रा. शांती सुमती बिल्डींग, म्हाडा कॉलनी, भारत नगर, चेंबुर, मुंबई नं. ७४) आणि अनिल कृष्णा शेट्टी (४५, रा. होमबाबा टेकडी हनुमान नगर, नेतीवली नाका, कल्याण-पूर्व) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखेचे हवा. किशोर पाटील आणि पोशि रविंद्र लांडगे यांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील दोन संशयीत इसम कल्याण रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या एसटी बस स्टॅण्ड येथून एसटी बसने बाहेर गांवी जाणार आहेत. या माहीतीच्या आधारे वपोनि नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदिप चव्हाण, सपोनि संतोष उगलमुगले, पोउनि संजय माळी, हवा. किशोर पाटील, विलास कडू, बालाजी शिंदे, बापूराव जाधव, अनुप कामत, सचिन वानखेडे, रविंद्र लांडगे, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे, विनोद चन्ने, विजेंद्र नवसारे, अमोल बोरकर यांनी गुरुवारी संध्याकाळी सव्वासात वाजता एसटी बस स्टॅण्ड परिसरात सापळा लावला. या सापळ्यात दोन जण अलगद अडकले. अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने सापडले. महात्मा फुले चौक, कोळसेवाडी, विष्णूनगर आणि रामनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या ६ गुन्ह्यांतील ३ लाख ७३ हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आल्याचे वपोनि नरेश पवार यांनी सांगितले.