प्रवासी महिलेकडून गँगमनविरोधात चोरीची तक्रार : कल्याणात रेलरोको

कल्याण : एका प्रवासी महिलेने रेल्वेचे काम करणारे गँगमन यांच्या विरोधात चोरीची तक्रार दाखल केल्याने संतप्त झालेल्या सेंट्रेल रेल्वे मजदूर संघाच्या पदाधिकारी व कर्मचा-यांनी  थेट रेल्वे रूळावरून उतरून कल्याणात रेलरोको केला. लोकलसमोरच ठियया मारल्याने दहा मिनीटे लोकल कल्याण स्थानकात थांबून राहिली. संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडल्याने रेल्वे पोलिसांची धावपळ उडाली होती.
सीएसटीकडे जाणा-या एका लोकलमधून एक प्रवासी महिला प्रवास करीत होती. ही लोकल कल्याण रेल्वे स्थानकात शिरत असतानाच त्या प्रवासी महिलेकडील काही वस्तू लोकलमधून खाली पडल्या. कल्याण स्थानकात लोकल थांबल्यानंतर ती महिला खाली उतरून ज्या ठिकाणी वस्तू पडल्या तिथे गेली. त्याचवेळी तेथे गँगमन काम करीत होते. यावेळी गौतम कदम नामक गँगमनने खाली पडलेला मोबाईल त्या महिलेच्या स्वाधीन केला. मात्र माझी पर्सही पडली असून त्यात पाच हजार रूपये असल्याचे सांगत तिने त्यांच्याकडे परत करण्याची मागणी केली. त्यावेळी गँगमने फक्त मोबाईल मिळाला पर्सबाबत माहिती नाही असे सांगितले. त्या महिलेचा समजूत काढण्याचा प्रयत्न गँगमनने केला मात्र तिने कल्याण रेल्वे पोलीस स्थानकात जाऊन गँगमन विरोधात पर्स चोरल्याची तक्रार केली. पोलिसांनी गँगमनला चौकशीसाठी बोलावून घेतले. मात्र हा प्रकार सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या पदाधिका-यांना समजताच त्यांनी थेट रेल्वे रूळावरून उतरून निदर्शने केली. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व रेल्वे मार्ग मोकळा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!