डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये व्ही. सी. एम. पॉलीयुरोथिन प्रा. लि. कंपनीत रविवारी सकाळच्या सुमारास अपघाताची घटना घडली. केमिकलच्या ड्रमचा स्फोट होऊन त्यात 4 कामगार भाजले. कबीर भोईर, राजू राठोड, सुमित राय आणि अभिषेक कुमार शाहू अशी जखमी कामगारांची नावे आहेत. या प्रकरणी स्थानिक मानपाडा पोलिस ठाण्यात कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या स्फोटात होरपळलेल्या कबीर भोईर याच्या तक्रारीवरून पोलिसांनी दीपक म्हात्रे आणि व्ही. सी. एम. पॉलीयुरोथिन प्रा. लि. कंपनी प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास या कंपनीत दुसऱ्या मजल्यावर हे कामगार साफसफाईचे काम करत होते. त्या ठिकाणी केमीकल ड्रम होता.
त्याच ठिकाणी इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे उडालेल्या ठिणग्या पडल्याने ड्रम फुटून त्यातील केमिकल कामगारांच्या अंगावर पडले. यात चारही कामगार गंभीर स्वरूपात जखमी झाले. केमीकल व रॉ मटेरीयलच्या ड्रमबाबत सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना आणि दक्षता घेतली नव्हती. यात कंपनी प्रशासनाचा बेकादरपणा, हयगय व निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक संपत फडोळ तपास करत आहेत.