डोंबिवली : कल्याण डोंबिवलीकरच नव्हे तर ठाणे, रायगड, मुंबईकर वाट पाहत असलेला १९ वा अखिल भारतीय महोत्सव १३ ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल डोंबिवली पूर्व येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवाचा उद्‌घाटन आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, सामाजिक नेते दशरथ दादा पाटील यांच्या शुभ हस्ते बुधवार दिनांक १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे.

अखिल भारतीय आगरी महोत्सव म्हणजे “एक आनंदाची पर्वणी ! या महोत्सवात संगीत नृत्य आगरी कोळी ठसकेबाज गीतांवरील नृत्याचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे तसेच दर्दी खवय्यांना स्वादिष्ट आगरी कोळी खादय पदार्थावर मनसोक्त ताव मारता येणार आहे. बच्चे कंपनीसाठी खेळण्याचा विभाग असणार आहे.

हा महोत्सव विधानसभा व लोकसभेच्या हिवाळी अधिवेशन काळात होत असल्याने असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, मंत्री रवींद्र चव्हाण , खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार गणपतशेठ गायकवाड, आमदार राजू पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार किसन कथोरे साहेब व इतर आमदार हे सर्व लोकप्रतिनिधी महोत्सव कालावधीमध्ये आगरी महोत्सव ला शुभेच्छा भेट देणार आहेत.

चूल आणि मूल या संसार चक्रात अडकलेल्या आमची माता भगिनी आज संसार चक्र भेदून समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे अशा महिला वर्गाच्या सन्मानार्थ महोत्सव मध्ये एक दिवस महिलांसाठी राखून ठेवलेला असून त्यादिवशी रंगमंचापासून सर्व व्यवस्थापन महिलांकडे देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत रुळलेल्या वाटेने न जाता धैर्याने स्वतःच्याच चालीने स्वतंत्र वाट निर्माण करणा-या काही महिलांचा सन्मान आगरी स्त्री शक्तीचा” या कार्यक्रमांमध्ये सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असणान्या सायली श्याम ठाकूर आणि उद्‌योजिका सायली पाटील, महाराष्ट्र केसरी उपविजेती ठरलेली कु. वैष्णवी पाटील, यांचा प्रतिनिधिक स्वरुपात सन्मान करण्यात येणार आहे.

अध्यात्मिक क्षेत्रात ही महिलांचा सक्रिय सहभाग वाढलेला आहे. हरिपाठ, भजन (गायन वादन) याबरोबरच प्रवचन, कीर्तनामधे (आध्यात्मिक निरुपण) आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. म्हणूनच महोत्सवच्या मंचावर समाजातील माता भगिनींचा सहभाग असलेल्या ज्ञानेश्वर माउलीच्या हरिपाठाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या हरिपाठामधे डोंबिवली, कल्याण, पनवेल, अंबरनाथ, भिवंडी परिसरातील महिलांचा सहभाग असणार आहे.

त्याचप्रमाणे वसुधैव कुटुम्बकम अध्यात्मपिठामधील माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज गुरुकुला मध्ये अध्यात्मिक शिक्षण घेणा-या वि‌द्यार्थ्यांचा स्वर तालबद्ध हरिपाठाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आगरी समाजाला संगीत भजनाची वैभवशाली परंपरा आहे. ही परंपरा जतन करणे, संवर्धित करण्याच्याहेतुने समाजातील नामवंत शास्त्रीय संगीत गायक, श्री नंदकुमार पाटील यांनी गाईलेल्या “संत वाणी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हरिपाठ, संगीत भजनाचा कार्यक्रमांमुळे आगरी महोत्सव परिसरातील वातावरण मंगलमय होणार आहे. असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!