छत्रपती शिवरायांच्या पुतळयाचे मोदींनी केले अनावरण
सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. नौदल दिनाच्या निमित्तानेच विविध कार्यक्रमांचं आयोजन सिंधुदुर्गात करण्यात आलं. यावेळी मोदींनी दोन मोठ्या घोषणा केल्या. नौदलाच्या गणवेशावर आता शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल, तसेच भारतीय नौदल आता आपल्या पदांची नावे भारतीय पंरपरेनुसार देणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदींनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये राजकोट किल्ला बांधला होता. या किल्ल्यावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचं अनावरण मोदींच्या हस्ते आज करण्यात आलं. या कार्यक्रमास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला छत्रपती वीर शिवाजी महाराज की जय, छत्रपती वीर संभाजी महाराज की जय, अशी घोषणा दिली. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्गाचं महत्त्व, तसेच सिंधुदुर्गातील किल्ल्याचं महत्त्व सांगितलं. त्यांनी शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांच्या गौरवाची गाथा सांगितली.
मोदी म्हणाले, आज ४ डिसेंबर हा ऐतिहासिक दिवस आपल्याला आशीर्वाद देतो की, सिंधुदुर्गचा ऐतिहासिक किल्ला. मालवण तारकल्लीचा हा सुंदर किराणा, चारही बाजूने छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रताप पसरलेला आहे. त्यांच्या विशाल प्रतिमेचं अनावरण आणि तुमच्यासाठी हुंकार प्रत्येक भारतीयाला जोशाने भरत आहे. तुमच्यासाठीच म्हटलं गेलं आहे की, चलो नयी मिसाल हो, बडो नया कमाल हो, झुको नहीं, रुको नही, बढे चलो. मी नौदलाच्या परिवाराच्या सर्व सदस्यांना नौदल दिनाच्या शुभेच्छा दितो. मी आजच्या दिवशी त्या शूरवीरांना प्रणाम करतो ज्यांनी मातृभूमीसाठी आपलं सर्वोच्च बलिदान दिलंय”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन आज भारत गुलामीच्या मानसिकताला मागे सोडून पुढे जात आहे. मला आनंद आहे की, आमचे नौदलाचे अधिकाऱ्यांच्या वर्दीवर छत्रपती शिवाजी महाराजांची झलक बघायला मिळेल. हे माझं भाग्य आहे की, नौदलाच्या ध्वजावर मला गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी जोडण्याची संधी मिळाली होती. आता नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या अपोलेट्सवरही छत्रपती वीर शिवाजी महाराजांचं प्रतिबिंब आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. मला अजून एक घोषणा करताना आनंद होत आहे. भारतीय नौसेना आपल्या रँक्सचं नामकरण भारतीय परंपरेच्या अनुसार करणार आहे”, अशा घोषणा नरेंद्र मोदी यांनी केल्या.
भारताचा इतिहास फक्त १ हजार वर्षाच्या गुलामीचा नाही. भारताचा इतिहास विजयाचा इतिहास आहे. भारताचा इतिहास शौर्याचा इतिहास आहे. भारताचा इतिहास ज्ञान, कला, कौशल्याचा, समुद्री सामर्थ्याचा इतिहास आहे”, असं मोदी म्हणाले.
सिंधुदुर्ग येथील तारकर्ली समुद्रकिनारी भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची ‘थरारक प्रात्यक्षिके ’ यांचे त्यांनी निरीक्षण केले. मोदी यांनीगार्ड ऑफ ऑनर सोहळ्याची पाहणी केली.
देशात गॅरंटीचं दुसरं नाव म्हणजे मोदी : एकनाथ शिंदे
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जनता आणि त्यांची मनं जोडणारे पंतप्रधान महाराष्ट्रात आले आहेत. काल निवडणुकीच्या निकालात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट पाहिली. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या देशाचं नाव मोठं केलं आहे. जगभरात सन्मान वाढवला आहे. आपल्या देशाची अर्थव्यवसथा बळकट केली आहे. कालच्या निकालातून एक गोष्ट देशातल्या नागरिकांनी सिद्ध केली की, देशात गॅरंटीचं दुसरं नाव म्हणजे मोदी असेही शिंदे म्हणाले