डोंबिवली : डोंबिवलीतील डाव्या चळवळीचे प्रेरक आणि ज्येष्ठ नेते कॉम्रेड विजयानंद हडकर यांचे बुधवारी वयाच्या 84 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. ज्येष्ठ संवेदनाशील डाव्या नेत्याच्या निधनामुळे शहरात हळहळ व्यक्ती केली जात आहे. इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले.

1961 साली झालेल्या गोवा मुक्ती आंदोलनात वयाच्या सोळाव्या वर्षे ते सहभागी झाले होते. या आंदोलनात त्यांनी मोर्चे आणि निदर्शनात सहभागी झालेल्या कॉम्रेड हडकर यांनी लाठी हल्ला सहन केला होता. तेव्हापासून कॉम्रेड विजयानंद हडकर हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि कम्युनिस्ट चळवळीत सक्रिय सहभागी होते. कम्युनिस्ट पक्षाच्या प्रकाशन विभागात आणि सोवियत मासिकाच्या कामकाजात ते दीर्घकाळ कार्यरत होते. अत्यंत चोखंदळ संपादक आणि मराठीतील ज्येष्ठ मुद्रित संशोधक म्हणून त्यांना मानाचे स्थान होते.

आयुष्यभर डाव्या चळवळीत पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून निष्ठेने काम करणारे कॉम्रेड हडकर हे 1975 पासून डोंबिवलीत राहत होते. सन 1980 पासून ते स्वतः रिक्षाचालक म्हणून काम करू लागले. त्याचबरोबर त्यांनी डोंबिवलीमध्ये लाल बावटा रिक्षा युनियनची स्थापना केली. डोंबिवलीतील रिक्षा चालकांना प्रथम संघटित करण्याचे श्रेय हे निःसंशयपणे कॉम्रेड हडकर यांचेच आहे. त्याचबरोबर डोंबिवलीतील अनेक पुरोगामी चळवळी व संघटनांशी कॉम्रेड हाडकर यांचा दीर्घकाळ संबंध होता. लोकविज्ञान संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नारी अत्याचार विरोधी मंच अशा विविध संघटनांमध्ये कॉम्रेड हडकर हे महत्त्वाची भूमिका बजावत असत. या सर्व संघटनांना आणि डोंबिवलीतील डाव्या व पुरोगामी चळवळींना कॉम्रेड विजयानंद हडकर हे नेहमीच आधार देत आणि एकत्र जोडून ठेवत. डाव्या आणि पुरोगामी चळवळीशी अखेरपर्यंत एकनिष्ठ असणाऱ्या कॉम्रेड हडकर यांनी जीवनात कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही. त्यामुळेच त्यांना समाजात अत्यंत आदराचे स्थान होते.
   

संपूर्ण आयुष्यभर आपल्या डाव्या जीवननिष्ठा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन कॉम्रेड विजयानंद हडकर यांनी शेवटपर्यंत पाळला होता. त्यामुळेच डोंबिवलीतीलच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील डाव्या आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना ते एक प्रेरणास्थान होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!