मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे. आज विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, मंत्री, दोन्ही सभागृहाचे सदस्य, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे संबंधित मान्यवर उपस्थित होते.

हिवाळी अधिवेशन गुरुवार दि. ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार दि. २० डिसेंबर २०२३ या कालावधीत पार पडणार आहे. अधिवेशनाचे एकूण दिवस १४ (सुट्ट्यासह) प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, सुट्या (शनिवार व रविवार) ४ दिवस असणार आहे.

विधान परिषदेचे शतकोत्तर वर्ष

तत्पुर्वी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी विधानभवन परिसराची पाहणी करून अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर ऑनलाइन सहभागी झाले होते. विधान परिषदेचे शतकोत्तर वर्ष साजरे केले जात आहे. सभागृहाची स्थापना १९२१ साली झाली. राज्याच्या विकासात परिषदेने उल्लेखनीय योगदान दिले. येत्या ८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री व विद्यमान आमदारांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात येईल, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

आरोग्य विभागाने परिसरात हिरकणी कक्ष व्यवस्था केली आहे. अधिवेशनानिमित्त आलेल्या महिलांसाठीदेखील विधानभवनाच्या बाहेर असा कक्ष स्थापन करण्यात येत आहे. रक्तदाब इतर तपासण्या २४ तास उपलब्ध राहतील. आमदार निवासातही ही व्यवस्था राहील. यावेळी अभ्यागतांच्या पाससाठी १२ तासांची मर्यादा ठेवली. तसेच, ही संख्या ५०० हूनआणखी कमी करता येईल का, याचाही विचार केला जात आहे, अशी माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. बैठकीस विधिमंडळाचे सचिव विलास आठवले, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह २२ विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

अशा केल्या सूचना

  • कर्मचारी, मोर्चेकरी आणि इतरांसाठी ठिकठिकाणी पेयजलाची व्यवस्था करण्यात येईल. स्वच्छतागृहांची माहिती गुगलवर टाकावे, पेट्रोल पंपवर स्वच्छता गृह वापरण्यासाठी परवानगी असते. यासाठी सूचना पत्र काढण्यात येईल.
  • परिसरात ज्युस व इतर खाद्यपेय असतात. त्यांची दर दोन दिवसांनी तपासणी करावी आणि काचेऐवजी पेपरचा ग्लास वापरल्यास योग्य ठरेल का, याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अन्न व औषध प्रशासनाला सूचना केली.
  • अधिवेशनात सुमारे ८ हजार कर्मचारी विविध आघाड्या सांभाळणार आहे. लोकप्रतिनिधींसोबत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याही आरोग्याची काळजी घेण्यात येईल.
  • विधिमंडळ कामकाजाचे शतकोत्तरी वर्ष असल्याने विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे.
  • वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक व्यवस्था आधीच करावी, अशी सूचनाही त्यांनी पोलिस यंत्रणेला केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *