कल्याण – येथील ज्येष्ठ पत्रकार दामुभाई ठक्कर यांचे मंगळवारी वृध्दापकाळाने निधन झाले. ते १०१ वयाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन विवाहित मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. ५० वर्षाहून अधिक काळ ते पत्रकारितेत होते.‘मुंबई समाचार’ दैनिकाचे दामुभाई ठक्कर ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी होते. या दैनिकासह त्यांनी जिल्ह्यातील गुजराती, मराठी दैनिकांसाठी काम केले. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे ते माजी अध्यक्ष होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री असताना ठाणे येथे पत्रकार संघाला जागा मिळवून देण्यात ठक्कर यांनी पुढाकार घेतला होता. गुजराती बरोबर मराठीवर त्यांचे प्रभुत्व होते.
वयाची शंभरी पूर्ण केली म्हणून अलीकडेच ठक्कर यांचा जनमत वार्ता, ज्येष्ठ पत्रकार राजाराम माने यांच्याकडून सन्मानित करण्यात आले होते. शासनाच्या बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचा लाभ मिळावा म्हणून मागील तीन ते चार वर्षापासून ते मंत्रालयात फेऱ्या मारत होते. अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. कल्याणात भाड्याच्या घरात राहात होते. पत्रकारिता कोट्यातून घर मिळावे म्हणून त्यांनी शासनाकडे प्रयत्न केले होते. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना अधिस्वीकृती पत्र मिळाले होते. सिटीझन जर्नलिस्टच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.