मुंबई : मुंबईतील दुकानांवर ठळक अक्षरात मराठी फलक लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार महापालिकेने मंगळवारी १७६ दुकानांवर कारवाई केली. एका दिवसात तब्बल ३ हजार २६९ दुकाने आणि आस्थापनांना भेटी देऊन पाहणी करण्यात आली. तसेच लवकरात लवकर मराठी फलक लावावेत अन्यथा कारवाईला सामोर जा, असा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे.

मुंबईतील सर्व दुकाने आणि आस्थापनांवर मराठी भाषेत, देवनागरी लिपीत ठळक नामफलक लावण्यासंदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी व्यापक बैठक घेतली होती. या बैठकीत सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी आणि उपायुक्‍त संजोग कबरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली दुकाने व आस्थापनांवर कारवाई करण्यासाठी २४ विभाग स्तरावर पथक स्थापन करण्यात आली आहेत.

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात लावण्याबाबत दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत २५ नोव्‍हेंबर रोजी संपुष्टात आली. त्यामुळे आज कारवाईची पावले उचलण्यात आली. आज एकाच दिवशी ३ हजार २६९ दुकाने व आस्थापनांना भेटी देऊन मराठी नामफलकांची तपासणी केली. त्यात ३ हजार ९३ आस्थापनांवर नामफलक आढळले. तर १७६ दुकाने व आस्थापनांवर मराठीत नामफलक लावलेले नव्हते त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच यापुढे फलक लावले तर प्रति व्यक्ती रुपये दोन हजार रुपये आणि जास्तीत जास्त एक लाख दंड आकारण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *