डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील जिओ कंपनीच्या गॅलरीत घुसलेल्या लुटारूने कोयत्याचा धाक दाखवून आयफोन चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत चोऱ्या, घरफोड्या, वाटमाऱ्या, हाणामाऱ्या, सशस्त्र दहशत, धारदार शस्त्राने हल्ल्याच्या घटनांत वाढ झाली आहे. कोयता गँगचा उपद्रव पुण्यासारख्या शहरात सुरू असताना त्याचे लोण कल्याण-डोंबिवलीत घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. डोंबिवलीमध्ये लागोपाठ घडलेल्या तीन घटनांमुळे शहरात कोयता गँग सक्रीय होत असल्याची भिती व्यक्त हेात आहे.
डोंबिवली पूर्वेकडील शहीद भगतसिंग रोडवर जिओ कंपनीची गॅलरी आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास एक जण जिओच्या गॅलरीत घुसला. त्याने बॅगेतून कोयता काढून तेथील सेल्समन ओमकार सुर्वे याच्या मानेवर ठेवला. या कोयत्याचा धाक दाखवत लुटारूने महागडा आयफोन चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र जीओच्या गॅलरीतील कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवत आरडाओरड केल्याने कोयताधारी लुटारूने तेथून पळ काढला. याप्रकरणी ओमकार अरूण सुर्वे (26) याच्या जबानीवरून रामनगर पोलिस ठाण्यात फरार लुटारूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.