डोंबिवली : आई वडील घरात नसतानाच दोन चोरटे घरात शिरले. आठ वर्षीय मुलगी घरात एकटी होती. चोरटयांनी तिचे हातपाय तोंड बांधून घरातील रोकड आणि दागिने घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पैसे आणि दागिने गेले असले तरी मुलगी सुरक्षित असल्याने आईवडीलांनी समाधान व्यक्त केले. मात्र पोलिसांनी चोरट्यांना तातडीने अटक केली पाहिजे अशी मागणी ही मुलीच्या आई वडिलांनी केली आहे. या घटनेनंतर सांस्कृतीक डोंबिवली नगरी हादरली असून, महिला व लहान मुलींचा सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

डोंबिवली पूर्वेतील नांदीवली टेकडी परिसरात वैद्यकीय व्यवसायात असलेले वडील कामावर गेले होते. आई शेजारी काही कामानिमित्त गेली होती. याचवेळी अचानक एक व्यक्ती चोरीच्या उद्देशाने घरात शिरला. त्यावेळी घरात आठ वर्षाची मुलगी वॉशरूम मध्ये गेली होती. या अनोळखी व्यक्तीने वाशरुममध्ये जाऊन त्या मुलीचे हात पाय आणि तोंड बाधून बाल्कनीत ठेवले. घरात झडती सुरु केली. घरातील हॉल, बेडरुम सगळीकडे शोध घेतला. या चोरटयाला घरातील देव्हाऱ्यात ठेवलेले आठ तोळ्याचे मंगळसूत्र आणि रोकड मिळाली. एक चोरटा दाराआड लपून बसला होता. चोरी करुन झाल्यावर त्या दोघांनी त्या मुलीला उचलून जिना उतरत होते. त्यावेळी मुलीने प्रतिकार केला. त्यांच्या तावडीतून ती निसटून घरात आली. आई आल्यानंतर तिने सर्व प्रकार सांगितला. आई वडीलांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. इमारतीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *