खंडणी विरोधी पथकाची खंबाळपाड्यात कारवाई
डोंबिवली : पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून तयार केलेले रील व्हायरल करणारा सुरेंद्र पाटील या ठाकुर्लीत राहणाऱ्या लाखो दिलों पे राज करणाऱ्या या कथित बादशाहाला खंडणी विरोधी पथकाने डोंबिवली जवळच्या खंबाळपाडा रोडला असलेल्या टाटा नाका परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून अग्नीशस्त्र साठ्यासह महागडी कारही हस्तगत करण्यात आली आहे. याच सुरेंद्रकडून यापूर्वी देखिल बंदूक, 5 जिवंत काडतुसे, आदी ५५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. परवानाधारी रिव्हाॅल्वरचा दुरूपयोग केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. रामायण मालिकेत याच सुरेंद्रने लव-कुश जोडीत भूमिका साकारली होती.
खंडणी विरोधी पथकाला खासगी गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीनंतर सपोनि एस. के. गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी खंबाळपाडा रोडला असलेल्या टाटा नाका परिसरात जाळे पसरले होते. या जाळ्यात सुरेंद्र पांडुरंग पाटील (50, रा. ठाकुर्ली) हा अलगद अडकला. अंगझडती दरम्यान त्याच्याकडे मॅग्झीनसह 1 गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल, 1 एक गावठी कट्टा, 7 जिवंत काडतुसे सापडली. या कारवाईत एम एच 05 /ई टी/7888 क्रमांकाची मर्सिडीज बेंझ कार देखिल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुरेंद्र पाटील याच्या विरूध्द मानपाडा पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याचे कलम 3, 25 (1 ब), (अ) सह महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कायदा कलम 37 (1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कथित बादशहाचे उपद्व्याप
ठाकुर्लीत राहणारा सुरेंद्र पाटील उर्फ चौधरी याचे सोशल मीडियापैकी इंस्टाग्रामवर एक लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. सुरेंद्र हा व्हॉट्स ॲपच्या स्टेटस, इंस्टाग्राम आणि रीलवर व्हिडियो करत असे. राणी नही है तो क्या हुआ…ये बादशहा आज भी लाखो दिलो पे राज करता है…या डायलॉगचा एक व्हिडियो त्याने काही महिन्यांपूर्वी व्हायरल केला होता. या महाभागाने प्रसिद्धी मिळवण्यासाठी पोलिस अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून रील बनवून ते व्हायरल देखिल केले. व्यवसायाने बिल्डर असलेल्या सुरेंद्रच्या विरोधात सात गुन्ह्यांच्या मालिका आहेत. खंडणी विरोधी पथकाने केलेल्या या कारवाईचा त्याच्या नावावर आठवा गुन्हा नोंदला गेला आहे.
पैशांच्या पावसाची भूरळ
काही भोंदूंनी याच सुरेंद्रला झटपट श्रीमंत होण्यासाठी आम्ही घरात पैशांचा पाऊस पाडून दाखवितो, असे आमिष दाखविले. पैशांच्या पावसाला भुललेल्या सुरेंद्रकडून ५० लाखांहून अधिक रक्कम उकळून भोंदूंनी पलायन केले होते. भोंदूबाबांना पकडून जप्त केलेली रक्कम ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी सुरेंद्रला पोलिस ठाण्यात बोलवले होते. त्यावेळी त्याने तेथे अधिकारी नसल्याचे पाहून खुर्चीत बसून पोलिस अधिकारी असल्याचा आभास वजा रूबाब मारत राणी नही तो क्या हुआ, ये बादशहा आज भी लाखो दिलोंपर राज करता है, असा व्हिडियो तयार करत सोशल मीडियावर व्हायरल केला होता. दबंगगिरीचा व्हिडियो इन्स्टाग्रामसह अन्य माध्यमांवर प्रसारित करुन पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.
रील स्टार १८ महिन्यांकरिता तडीपार
पोलिस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर त्याने आपल्या महागड्या कारच्या बाजूला हस्तकांना घेऊन परवानाधारी रिव्हॉल्व्हर हातात घेऊन नाचगाणी सादर केली. या व्हिडियोंमुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवून सुरेंद्र याला तात्काळ अटक केली होती. या रील स्टार वजा गुन्हेगाराला १८ महिन्यांकरिता तीन जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले होते. तरीही तो शहरात दाखल झाला होता. अखेर खंडणी विरोधी पथकाने रिव्हॉल्वरसह त्याला जेरबंद करण्यात यश मिळविले.