डोंबिवली : डोंबिवलीतील बालदोस्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला, मनोरंजन, धम्माल मौजमस्तीची लयलूट करून देणारा किलबिल फेस्टिव्हल रविवार, १९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती डोंबिवली विधानसभेचे आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. चव्हाण ह्यांच्या संकल्पनेतून मागील ११ वर्षापासून होणारा हा फेस्टिव्हल डोंबिवली पश्चिमेतील बावनचाळीतील रेल्वे मैदानावर होणार आहे. संध्याकाळी चार ते रात्री १० वाजेपर्यंत हा फेस्टिव्हल सुरू राहणार आहे. हा कार्यक्रम बालदोस्तांसाठी मोफत आहे.

साहित्यिक, सांस्कृतिक नगरीत विविध प्रकारचे कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांमध्ये बालगोपाळांसाठी एकही कार्यक्रम होत नसल्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आले. त्यांनी वर्षभरातून एकदा तरी बालगोपाळांसाठी एक मनोरंजनाचा धुमधडाक्यात कार्यक्रम झाला पाहिजे असे ठरविले. या नियोजनातून किलबिल फेस्टिव्हलची संकल्पना पुढे आली.
फक्त बालदोस्तांसाठी असणाऱ्या या मनोरंजनपर कार्यक्रमात फक्त धम्माल मौजमस्ती असते. डोंबिवली परिसरातील पालक आपल्या मुलांना घेऊन या कार्यक्रमात सहभागी होतात. चित्रकला, टॅटू, कॅरिकेचर काढणे, कुंभाराच्या चाकावर मातीच्या मडक्यांसह इतर भांडी तयार करणे, वायरपासून खेळणी तयार करणे, तांदळावर नाव कोरणे, आकर्षक मेंदी काढणे, लाखेपासून बांगड्या तयार करण्याचे कार्यक्रम महोत्सवात आहेत. याशिवाय ड्रामा, जादूचे प्रयोग, जगलरचे प्रयोग पाहण्यास मिळणार आहेत.

जगदविख्यात बोलक्या बाहुल्यांचे जनक रामदास पाध्ये यांचा मुलगा सत्यजित पाध्ये ‘अर्धवटरावां’सह बोलगोपाळांबरोबर मौज करण्यासाठी येणार आहेत. इंडियाज गाॅट टॅलेंट या रिॲलिटी शोमधील ‘झिरो डिग्री’ ग्रुप डान्स यांचाही समावेश कार्यक्रमात आहे. ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम मोहित आणि शौर्य हे भाऊ-बहिण महोत्सवात गाणी गाणार आहेत.

हवेत नृत्यकला सादर करणारी शुटिंग स्टार, अल्लाउद्दिनचा जीन, रोली पोली, मिकी माऊस, मिनी, जायंट टेडी बेअर, जायंट पांडा, जोकर छोट्या बालगोपाळांबरोबर धम्माल मौज करणार आहेत. स्टिक वाॅकर आणि मिरर मॅन हे फेस्टिव्हलचे आकर्षण असणार आहे.

कमांडो ब्रिज, रिव्हर क्राॅसिंग, वाॅल क्लायमिंब, सेगवे व्हेईकल्स या कसरतींचे थरार महोत्सवात अनुभवता येणार आहेत. ट्रम्पोलाईन, राॅक हॅमर, जम्पिंग सारखे खेळ किलबिल फेस्टिव्हलमध्ये आहेत अशी माहिती रविंद्र चव्हाणांनी दिली.

ही सर्व धम्माल मस्ती बालगोपाळांना मोफत उपलब्ध असणार आहे. दिवाळीची सुट्टी असल्याने शाळांना सुट्टी आहे. त्यामुळे डोंबिवलीतील बालदोस्तांनी अधिक संख्येने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *