स्वर्गिय शशिकांत ठोसर यांना डोंबिवलीकरांनी वाहिली श्रद्धांजली …

डोंबिवली :  शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख व नामवंत विधिज्ञ अॅड स्वर्गीय शशिकांत ठोसर यांची शोकसभा बुधवारी डोंबिवलीत पार पडली.  सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी शोकसभेत उपस्थित होती यावेळी अनेक मान्यवरांनी स्वर्गीय ठोसर यांच्या सामाजिक उपक्रमातून समाजाविषयीचे त्यांचे उत्तदायित्व विविध सामाजिक कामांच्या आठवणींना आणि राजकारणात काम करीत असतानाही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचे सूत्र त्यांनी जपले त्यांच्या या कार्यशैलीला मान्यवरांनी आपल्या भाषणातून उजाळा देत त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शोकसभेला राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, महापौर राजेंद्र देवळेकर, स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे, विरोधी पक्षनेता मंदार हळबे, भाजपचे नगरसेवक राहूल दामले, शिवसेनेचे नगरसेवक दिपेश म्हात्रे , काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी पाटील, गणेश मंदिर संस्थानचे अच्युत कराडकर, शिवसेनेचे प्रभाकर चौधरी यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

अॅड शशिकांत ठोसर यांचे शनिवारी प्रदिर्घ आजाराने मुंबई येथे उपचार सुरु असताना निधन झाले.  डोंबिवलीत शिवसेनेचे नगरपरिषद काळात निवडून आलेले ते पहिले नगरसेवक होते. संघाच्या बालेकिल्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून शिवसेनेला वेगळी ओळख व बळ मिळवून देणारे खंबीर नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. सेना नेतृत्वाची धुरा सांभाळत जोमाने पक्ष संघटनेच्या बांधणीसाठी सातत्याने झटत असतानाच आपला वकिली व्यवसाय सांभाळून त्यांनी अनेक वर्षे अभिनव सहकारी बँक, ग्रीन्स इंग्लिश स्कूल या संस्था अध्यक्ष व संचालक पदावर अनेक वर्षे सक्षमपणे काम करून नावारुपाला आणल्या. डोंबिवली जवळपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व कमी खर्चात शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी शिवाई बालक मंदिर या शाळेची सुरूवात केली. कल्याण बार असोशिएशनचे अध्यक्षपदही त्यांनी भुषविले. स्व ठोसर यांनी भुषविलेली विविध पदे आणि त्याच्या माध्यमातून उभ केलेल्या कामाचा सगळयांनीच गौरव करीत त्यांना श्रध्दांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *