राज्य सरकारकडून शेतक-यांची थट्टाच : कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले, पण कर्जमाफीची प्रतिक्षाच 

ठाणे जिल्हयातील प्रकार उजेडात

 भिवंडी – राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्यातील ३७ शेतकऱ्यांना कर्ज माफीचे प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. मात्र भिवंडी तालुक्यातील शिरोळे गावातील शिवराम पाटील यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले मात्र अजूनही कर्जमाफी मिळाली नसल्याचे प्रकरण समोर आलंय. सध्या शिवराम पाटील यांना दिवसाआड बँकेच्या पाय- या झिजवाव्या लागत आहे. पाटील यांची अवघे 20 हजार रूपयाचे कर्जमाफी होऊ शकलेली नाही त्यामुळे लाखो रूपयांची कर्जमाफी कशी होणार असा संतप्त सवाल पाटील यांनी सिटीझन जर्नलिस्टशी बोलताना केला. शेतक-यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असतानाच भिवंडीतील प्रकरण समोर आल्याने सरकार पून्हा एकदा कोंडीत सापडल आहे.

राज्य सरकारच्यावतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना राबविण्यात आली आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी  शेतक-यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्याची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केल्यानंतर ठाण्यातील नियोजन भवन येथे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दीड लाखापर्यंत कर्ज असणाऱ्या एकूण ३७ शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले.  ठाण्यात देखील शहापूर, मुरबाड आणि भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले होते.  ठाणे जिल्ह्यात एकूण २३ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार  आहे. त्यापैकी ५ हजार ९४५ लाभार्थी शेतकऱ्यांची टप्प्याटप्प्याने कर्जमाफी होणार आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक जिल्हयात कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले आता कर्जमुक्त झालो अशी धारणा शेतक- यांची झाली पण भिवंडी तालुक्यातील शिरोळे गावातील शिवराम पाटील यांना कर्ज माफीचे प्रमाणपत्र देण्यात आले असून अद्याप त्यांचे कर्जमाफ झालेले नाही. पाटील हे बँकेत रोजच फे-या मारीत असल्याने आता कंटाळले आहेत. त्यामुळे सरकारविषयी त्यांच्या मनात नाराजीची भावना आहे.  भिवंडीतील हे प्रकरण उजेडात आले असले तरी अजूनही आणखी अनेक शेतकरी असू शकतील असा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!