आष्टी येथे भारती विद्या भवन्स शाळेतील दुर्दैवी घटना
शाळा व्यवस्थापनावर बेजबाबदारीचा आरोप
नागपूर, 02 नोव्हेंबर : नागपुरतील आष्टी इथला भारती विद्या भवन्स शाळेच्या आवारातल्या खड्ड्यात पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, गुरुवारी घडली. सारंग होमेश्वर नागपुरे असे या आठ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून ते इयत्ता तिसरीत शिकत होता. विशेष म्हणजे पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत.
भारती विद्या भवन्स शाळेच्या नागपूर जिल्ह्यात विविध शाखा आहेत. कळमेश्वर तालुक्यातील आष्टी इथल्या शेखेत मृतक विद्यार्थी सारंग शिकत होता. या शाळेच्या मैदानात बांधकामासाठी खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्याच्या भोवती कुठलीही सुरक्षिततेची उपाययोजना करण्यात आलेली नव्हती. या उघड्या खड्ड्यात गुरुवारी दुपारच्या सुटीत खेळताना सारंग नागपुरे हा बालक पडला. बऱ्याच वेळेपर्यत तो खड्यात पडून होता. परंतु तेथे एकही शिक्षक अथवा कर्मचारी उपस्थित नसल्याने त्याच्या मदतीसाठी कोणीही धावून आले नाही. अखेर मुलांनी शिक्षकांना सारंग खड्यात पडल्याचे सांगितले. या घटनेने शाळेच्या आवारात एकच खळबळ माजली. सर्व शिक्षक खड्याकडे धावत आले. त्यांनी विद्यार्थ्याला खड्यातून बाहेर काढले. यावेळी मुलाच्या कानाला, नाकाला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. खूप वेळ पर्यत सारंग खड्यात पडून असल्याने तो बेशुध्द झाला होता. त्याला तत्काळ मानकापूर येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले असता डॉक्टरांनी बालकाला तपासून मृत घोषित केले.
पालक आपल्या पाल्यांना शिक्षकांच्या भरोशावर शाळेत पाठवितात. परंतु शिक्षकांनी मुलांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेला शाळा प्रशासनच जबाबदार आहे, असा आरोप मृतक विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. शाळेच्या निष्काळजीपणामुळे मुलाला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या आई वडिलाने केला आहे. या प्रकरणी राष्ट्रीय शिक्षक पालक संघटनेचे राष्ट्रीय संयोजक योगेश रामचंद्र पाथरे यांनी घटनेच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान शाळा व्यवस्थापनाकडून या अपघाताबाबत काहीही खुलासा करण्यात आलेला नाही.